Prithviraj Chavan: महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकार हे महाविकास आघाडीचा सामना करू शकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला निर्धार
Prithviraj Chavan: महाविकास आघाडीला भगदाड पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही भक्कम आहोत भाजप यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Prithviraj Chavan: देशात मोदी सरकारला सत्तेत येऊन आज 9 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला 9 प्रश्न विचारत धारेवर धरले. ते आज कोल्हापुरात बोलत होते. आमची महाविकास आघाडी भक्कमपणे भाजपला तोंड देणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकार हे महाविकास आघाडीचा सामना करू शकणार नाही. ते म्हणाले की, महाविकास आघाडीला भगदाड पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही भक्कम आहोत भाजप यशस्वी होणार नाही.
कुणाला पदावर ठेवायचं हे वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो, त्यामुळे पटोले यांच्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. वरिष्ठांना भेटणं यात काही गैर नाही. कर्नाटकमधील काँग्रेसची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. दोन पक्षांशी आघाडी असणं आणि तीन पक्षांशी आघाडी असणं हे वेगळं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ मिळालं पाहिजे असं केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःच्या हाताने स्वतःचा राज्याभिषेक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबून नवीन संसद भवन बांधलं आहे. त्याची गरज होती का हा देखील प्रश्न आहे? आम्ही बहिष्कार टाकण्याचे कारण म्हणजे मोदी यांनी राष्ट्रपती यांना बोलावलं नाही. स्वतःच्या हाताने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात का? असं दिसतं. राष्ट्रपती यांचा अपमान आम्ही सहन सहन करणार नाही. त्यामुळे मोदींना स्वतःच काय उदो उदो करायचं ते करा. नव्या संसदेच्या कार्यक्रमावर 19 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
काँग्रेसकडून मोदी सरकारला 9 प्रश्न
ते म्हणाले की, मोदी पंतप्रधान होऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांना 9 प्रश्न आम्ही करत आहोत. कर्ज काढून सरकार चालत नाही, आता महागाई वाढवून ठेवली. आता तर कर वाढवून पैसे गोळा केले, पण सरकार चालवता येत नाही. त्यामुळे कंपन्या विकल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होता त्याचे काय झाले? भाई-भतीजा यांना लाभ देण्याचं काम सरकारनं केलं आहे? अदानी हे कोण आहेत हा प्रश्न केला होता पण त्याचे उत्तर दिले नाही, असे ते म्हणाले.
मोदींनी सामाजिक बांधिलकी मोडून काढली
चीनच्या प्रश्नावर संसदेत बोललं जातं नाही, चीनने जमीन बळकवलेली आहे, जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण केले जातात आणि राजकीय पोळी भाजून घेतली जाते. मोदींनी सामाजिक बांधिलकी मोडून काढली, असा आरोपही त्यांनी केला. कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. मात्र, ब्रिजभूषण केवळ भाजपचे खासदार असल्याने कारवाई केली जात नसल्याचे ते म्हणाले. जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे त्याबद्दल मोदी काहीही बोलायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक निकालावरुन टोला
कर्नाटक निवडणुकीत भाजपचे फडणवीस म्हणतात की आमची मतं आहे तशी आहेत, पण तसं झालं नाही एक विभाग वगळता सर्व ठिकाणी आम्ही दणदणीत विजय मिळवला आहे. याचा अर्थ मोदींची जादू आता कमी होत चालली आहे. बजरंग बली हा मुद्दा आणला पण ते काही चालले नाही. त्यामुळे आता देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे 65 टक्के लोकांनी मोदींचा पराभव करण्यासाठी मतदान केलं असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे त्याबद्दल मोदी काही बोलत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या योजना बंद केल्या जात आहेत, देशाचा विकास असंतुलित पद्धतीने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या