Kolhapur News : कोल्हापूर बाजार समितीसाठी प्रचार थांबला; 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात, उद्या होणार मतदान
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शिंदे गट विरोधात सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गट अशी लढत होत आहे. प्रचारासाठी अवघा एक आठवडा कालावधी मिळाला.
Kolhapur Bajar Samiti Election : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी बुधवारी (26 एप्रिल) प्रचार थांबला. एकूण 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात असून उद्या (28 एप्रिल) मतदान होत आहे. मतदान सात जिल्ह्यातील 70 केंद्रांवर होणार आहे. मतमोजणी रविवारी (30 एप्रिल) रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शिंदे गट विरोधात सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गट अशी लढत होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अवघा एक आठवडा प्रचाराचा कालावधी मिळाला. या निवडणुकीसाठी 1175 विकास संस्थेतील 14 हजार 133, तर 603 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 733 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. विकास सेवा संस्था गटातून 11, ग्रामपंचायत गटातून चार, व्यापारी-अडते गटातून दोन तर हमाल-तोलाईदार गटातून एक जागा आहे. एकूण 18 जागांसाठी 51 जण नशीब अजमावत आहेत. 15 अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही
दरम्यान, एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त अंतिम यादीत नाव असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही. निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. विकास संस्था, ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीचे मतदार आहेत. अडते, व्यापारी गटात दोन तीन फर्मचे मालक एकच असल्याने एकच नाव दोन तीन वेळा आहे. मात्र, प्राधिकरणाच्या या निर्णयाने एकच मत करता येईल. 2017 च्या पणन कायद्यातील दुरुस्तीमुळे प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. याचा फटका व्यापारी गटात बसण्याची चिन्हे आहेत.
गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध
दरम्यान, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अनेक दशकांमध्ये प्रथमच बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे निवडणूक खर्च वाचला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात जागा बिनविरोध
दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत सोसायटी महिला प्रतिनिधी गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, व्यापारी व अडते गट आणि हमाल तोलाई गटातील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या गटाची निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय आघाडीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सोसायटी गटातील सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, भटक्या जाती व भटक्या जमाती आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात 11 जागांसाठी 21 उमेदवार शिल्लक राहिल्याने निवडणूक होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या