(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya in kolhapur : हसन मुश्रीफ यांना भाजपत येण्याचे निमंत्रण दिलं का नाही, याबाबत चंद्रकांत पाटलांनीच भूमिका स्पष्ट करावी: किरीट सोमय्या
किरीट सोमय्या यांनी आज मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंर कोल्हापूर दौरा केला. शासकीय विश्रामगृहात त्यांनी मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या कंत्राटाची चौकशी होणार असल्याची माहिती दिली.
Kirit Somaiya In kolhapur : हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याची कागदपत्रे पहिल्यांनंतर त्यांना घाम फुटला असल्याचा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. किरीट सोमय्या यांनी आज हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर कोल्हापूर दौरा केला. हसन मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या कंत्राटाची चौकशी होणार असल्याची माहिती दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, मुश्रीफ यांनी ईडी कारवाईनंतर विशिष्ट लोकांनाच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता सोमय्या यांनी मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही खेचले. ते पुढे म्हणाले की, "शरद पवार यांच्यामध्ये हिंमत असेल, तर मुश्रीफ यांच्या वक्तव्याला समर्थन द्यावे. मुस्लीम नेत्यांना टार्गेट केलं जातं असं पवार यांनी म्हणावं. उद्धव ठाकरे यांनी म्हणावे हे मान्य आहे का? भ्रष्टाचार करताना जात आठवली नाही का? दोन्ही हातात हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिका जाहीर करावं."
चंद्रकांत पाटलांनीच भूमिका स्पष्ट करावी
तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंदकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपत येण्यासाठी निमंत्रण दिल्याची चर्चा रंगली होती. याबाबत त्यांना विचारले असता सोमय्या यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपत येण्याचे निमंत्रण दिलं की नाही? याबाबत चंद्रकांत पाटील यांनीच आपली भूमिका जाहीर करावी.
49 कोटी 85 लाख रुपये कुठून आले?
किरीट सोमय्या म्हणाले की, "158 कोटी रुपये कोलकातामधून आले. अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमधून 49 कोटी रुपये मुश्रीफ यांच्या खात्यावर आले. रजत प्राव्हेट लिमिटेड, माऊंट प्रायव्हेट लिमिटेडचा मुश्रीफ साहेब यांच्या कंपन्यांशी काय संबंध? मुश्रीफ यांच्या कुटुंबाचे संबंध कसे आले? हे मुश्रीफ यांनी जाहीर करावे."
ते पुढे म्हणाले, "अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमार्फत 49 कोटी 85 लाख रुपये कसे मिळतात? हे मुश्रीफ यांनी सांगावं. कंपनीमार्फत चेक दिला जातो, त्यानंतर मुश्रीफ यांच्यामार्फत तो चेक बँकेत जमा केला. मुश्रीफ यांनी आपल्या जावयामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला 50 हजार रुपये देण्याचा जीआर काढला होता, पण जीआर रद्द केला अस सांगितले जाते. मात्र, तुम्ही त्याला ठेका दिला होता की नाही हे सांगा. दरवर्षी राज्यातील ग्रामपंचायतीना 150 कोटींचा भुर्दंड बसणार होता. हे कंत्राट कसं दिलं या सगळ्याची चौकशी होणार आहे."
इतर महत्वाच्या बातम्या