Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी नागपूर महामार्ग जमीन संपादनासाठी 850 कोटी रुपयांचा निधी वर्ग; रखडलेल्या कामाला गती येणार
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी 74 किलोमीटर लांबीच्या आंबा ते चोकाक गावातील संपादित जमिनीच्या मोबदल्यात 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
Nagpur-Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी (कोल्हापूर जिल्ह्यातील) 74 किलोमीटर लांबीच्या आंबा ते चोकाक गावातील संपादित जमिनीच्या मोबदल्यात 850 कोटी रुपयांचा निधी विशेष भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला. या मार्गासाठी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे, मात्र निधीअभावी संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. आता निधी उपलब्ध झाल्याने कामाला गती येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी ते नागपूर या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) चार टप्प्यांत जमीन संपादित करण्यात आली आहे. यामधील आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक असे दोन टप्पे जिल्ह्यात येतात. यातील पहिल्या टप्प्यासाठी 467 हेक्टर, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 152 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी जवळपास 96 टक्के जमीन संपादित झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी निधीचे वाटप झाले आहे. मात्र, उर्वरित संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीच न आल्याने जमीन संपादनाचे काम रखडले होते.
मिळालेल्या 850 कोटी रुपये निधीपैकी आंबा ते पैजारवाडी या मार्गासाठी 417 कोटी, तर तर पैजारवाडी ते चोकाकपर्यंतच्या मार्गासाठी 435 कोटी रुपये मिळणार आहेत. बरेच दिवस निधी मिळत नसल्याने जमीन मालक त्रस्त होते. दुसरीकडे निधी न आल्याने जमीन संपादनाचे काम रखडले होते. आता या दोन्ही कामाला वेग येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे सादर करून संपादित जमिनीचा मोबदला घेऊन जाण्याचे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंतराव पंदारकर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या