Jyoti Malhotra: पहलगाम हल्ल्यावेळी ज्योती मल्होत्रा पाकच्या उच्चायुक्तालय अधिकाऱ्याच्या संपर्कात? हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीत मोठी माहिती उघड
Jyoti Malhotra Vlogger News: हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

Jyoti Malhotra Vlogger News: हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की पाकिस्तान दूतावासातील अहसान-उर-रहीम उर्फ दानिश हा युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होता. याशिवाय, भारतातील अनेक सोशल मीडिया इनफ्लुएंसर देखील दानिश संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि भारत-पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यानही (India Pakistan War) ज्योती दानिशच्या सतत संपर्कात होती. शिवाय ज्योतीच्या पाकिस्तान भेटीचा सर्व खर्च पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या दानिशनेच केल्याचे आता चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, ज्योती काश्मीरमध्ये कोणत्या लोकांना भेटली, या भेटीत नेमकं काय काय घडलं, याची माहिती सध्या गोळा केली जात आहे. मात्र तपासाअंती यातील सत्य समोर येणार आहे.
ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्च दानिशने उचलला
पहलगाम हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) दानिश भारतातील अनेक सोशल मीडिया इनफ्लुएंसरच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. या काळात तो ज्योतीचा माध्यम म्हणून वापर करत होता. ज्योतीच्या पाकिस्तानमधील सर्व प्रवासाचा खर्च दानिशनेच केला होता.
ज्योती मल्होत्राच्या प्रवासाचा खर्च उचलणारा दानिश कोण?
अहसान-उर-रहीम उर्फ दानिश हा पाकिस्तान दूतावासात राजनैतिक अधिकारी होता, परंतु भारतीय एजन्सींनी 13 मे 2025 रोजी "अनिष्ट कृत्यांमध्ये" सहभागी झाल्यामुळे 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले होते. 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना ज्योतीची दानिशशी भेट झाली. जिथे ती एका शिष्टमंडळासोबत गेली होती. भारतात परतल्यानंतर, तिने दानिशशी संपर्क राखला आणि त्याच्या सूचनेनुसार, ती पुन्हा पाकिस्तानला गेली. जिथे ती शकीर आणि राणा शाहबाज सारख्या पाकिस्तानी गुप्तचर एजंटांनाही भेटली.
ऑपरेशन सिंदूर आणि लष्करी कारवायांची माहिती लीक
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्योती मल्होत्राने केवळ सामाजिक बैठका घेतल्या नाहीत, तर भारताच्या लष्करी तळांशी आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित संवेदनशील माहितीही पाकिस्तानी एजंटना पुरवली असल्याचे सांगितलं जातंय.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ती पाकिस्तानी बाजूला भारताच्या लष्करी तयारीबद्दल माहिती देत राहिली, असेही तपासात समोर आले आहे.
अटकेनंतर काय उघड झाले?
तपास यंत्रणांनी ज्योतीची अनेक डिवाइसेज, सोशल मीडिया अकाउंट्स आणि कॉल रेकॉर्ड तपासले, ज्यामुळे ती दानिश आणि इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आणखी अनेक नावे समोर आली आहेत, ज्यांच्यावरही आता कारवाई केली जाऊ शकते.
हे ही वाचा
























