Raosaheb Danve : 'संजय राऊत भाड्याने ठेवलाय'; रावसाहेब दानवेंची जहरी टीका
Raosaheb Danve On Sanjay Raut : जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी मिळाली असून, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Raosaheb Danve On Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) सभेला भाड्याने माणसं आणली जातात अशी टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊतच प्रवक्ता म्हणून भाड्याने ठेवलेला आहे. तो कुठं घराचा आहे,” असे दानवे म्हणाले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी मिळाली असून, त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
दरम्यान 'एबीपी माझा'शी बोलतांना दानवे म्हणाले की, “संघटनेमध्ये काम करत असतांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे सहाव्यांदा पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. मला लढाई अवघड आणि सोपी काही नाही. मी जेवढ्या निवडणुका लढल्या त्यामध्ये माझ्यासमोर कोण येईल, याची मी कधीच चिंता केली नाही. मागच्या वेळी विजयाची जेवढी मतं घेतली, तेवढीच मत यावेळी घेऊ. जालन्याची लोकसभा पक्षाने जनतेने गृहीत धरलेली आहे, असं दानवे म्हणाले.
संभाजीनगर- हिंगोलीची जागा कुणाला मिळणार?
प्रत्येक पक्षाला मी जास्त जागा लढावं असं वाटतं. युतीमध्ये तीन मोठे घटक आहेत, कोणत्या जागा कोण लढणार हे स्पष्ट आहे. मात्र, यात थोडेफार बदल होऊ शकतात, लवकरच त्याही जागा जाहीर होतील असे दानवे म्हणाले.
नाराजांची समजूत काढली जाईल...
"जे कार्यकर्ते एवढे वर्ष आमच्यासोबत काम करत आहेत. त्यांचे आणि आमची मन मिळालेले असतात. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाली नाही, तर तेवढा एक तात्पुरता असंतोष कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये असू शकतो. याचा अर्थ असा होत नाही की, ते आता आम्ही दिलेला उमेदवाराला मतदान करणार नाहीत. सुजय विखेंना उमेदवारी दिल्याने कोणी नाराज झाले असेल, तर त्या पक्षाचे नेते त्यांची समजूत काढतील,” असे दानवे म्हणाले. आमच्या मुंबईच्या जागेवरून कार्यकर्त्यांची काही नाराजी असेल, तर सर्व एकत्रित बसून त्यांची समजूत काढली जाईल. पण, याचा अर्थ असा नाही की, आम्ही दिलेल्या नेत्याच्या विरोधात कार्यकर्ते जातील.
बारामतीची जागा अजित पवारांना देणार का?
बारामतीचा उमेदवार लवकरच जाहीर होईल. आता अजित दादा, शिंदे साहेब किंवा भाजपचा उमेदवार असे नसणार आहे, तर एनडीएचा उमेदवार राहील. आमचे तीन नेते एकत्रित बसून ते निर्णय घेतील, असे दानवे म्हणाले.
शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा देणार?
ज्याची जेवढी संख्या आहे, तेवढं त्यांना द्यावेच लागते. याशिवाय काही जागेमध्ये फेरबदल होऊ शकतात. कोणतेफेरबदल करायचे हे आमचे तीनही नेते ठरवतील. त्याची संख्या काय असेल हे आमचे नेतृत्व ठरवेल. त्या विषयात फार चर्चा करावी असं काही नाही ते जे करतील ते योग्य करतील,असेही दानवे म्हणाले.
सुधीर मनगुंटीवार, पंकजा मुंडे यांच्या निवडीचे काय निकष वापरले?
निवडणूक कोणती लढाईची हे आमच्यावर नाही, तर नेतृत्वाने दिलेला आदेश पाळणारे आम्ही आहोत. पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार किंवा पियुष गोयल असोत. मलाच चाळीसाव्या वर्षी खासदारकीला उभे राहावं लागलं. पक्ष आदेश म्हणून मी तो पाळला. ज्यांना तिकीट दिले नाही त्यांनी देखील पक्षाचा आदेश मानला, असे दानवे म्हणाले.
स्वबळावर निवडणूक लढवली जाऊ शकत नाही...
आता देशामध्ये कोणताच राजकीय पक्ष असा नाही की, तो स्वबळावर निवडणूक लढवेल. मित्र पक्षाला सोबत घ्यावे लागते. मित्र पक्षाला सोबत घ्यायचे असेल तर त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. त्यांचं राजकीय अस्तित्व कायम ठेवून त्यांना जागा दिल्या पाहिजेत याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही बिहार, उत्तर प्रदेशात, महराष्ट्रात जागा दिल्या सर्वांना आम्ही मान सन्मान दिला असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या