काय सांगता! जालन्यातील मनोज जरांगेंच्या रॅलीत एक कोटींची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद
Manoj Jarange Rally in Jalna : चोरीची घटना सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ देखील आयोजकांनी पोलिसांना दिला आहे.
जालना : शहरात 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेत तब्बल एक कोटी रुपयांची सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जालन्यातील (Jalna) सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे चोरीची घटना सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ देखील आयोजकांनी पोलिसांना दिला आहे. ज्यात चोरी करणारा आरोपी स्पष्ट दिसत आहे.
मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला जालना येथून सुरुवात झाली होती. यावेळी मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी शहरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आणि सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर चैन स्नॅचिंग तसेच पाकीटमारांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या. सभा स्थळापासून काही दुचाकी देखील चोरी गेल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांकडे तक्रार...
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "मराठा आरक्षणा निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या दिवसी मोतीबाग जवळील छत्रपती संभाजी उद्यानापासून मराठा मोटार सायकल रॅलीने सुरुवात करण्यात आली. दरम्यान, रॅलीची सुरवात करण्यापूर्वीपासून तर शनी मंदिर, गांधीचमन, मस्तगड, शिवाजी पुतळा, भोकरदन नाकामार्गे पांजरपोळ या ठिकाणी जाईपर्यंत जालना शहरातील किमान 40 ते 50 गळ्यातील सोन्याच्या साखळ्या (चैन), खिशातील पॉकेट, पर्स आणि जवळपास 80 ते 90 मोबाईल सराईत गुन्हेगारा मार्फत मोठ्या शिताफीने चोरी गेले आहेत. ज्यात गर्दीचा फायदा घेवून जवळपास अदाजे एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या ऐवाजावर चोरांनी डल्ला मारल्याचे दिसून येत आहे.
अशी करायचे चोरी...
या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, चैन चोरी करताना दाताने तोडणे, कट करणे, मानवी साखळी धरणारे स्वयंसेवक याच्या खिशातील पॉकेट काढून घेणे, असे विविध प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. सदरील बाबीचे घटनाक्रमाचे काही फोटो, विडीओ फुटेजच्या माध्यमातून दिसून येत आहे. सदरील टोळी ही सराईत असल्यामुळे बहुतेक प्रभावित व्यक्तींना सदरील बाब ही उशिराने कळल्यामुळे चोराचे इसिप्त साध्य झाले आहे. सराईत चोरामार्फत चोरले गेलेले साहित्य (साखळी तोडताना) बाबत व्हिडिओ फुटेज फोटो उपलब्ध आहेत. माहितीस्तव आपल्या अर्जासोबत व्हिडिओ सादर करत आहोत. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून तात्काळ शोध घेऊन मराठा समाज बांधवांच्या चोरी झालेल्या, गर्दीत शिताफीने गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्याबाबत संबंधित विभागास आपल्या स्तरावर निर्देश देवून योग्य ती कारवाई तात्काळ करण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: