जालन्यात आजही मराठा समाज आक्रमक, आंदोलक तरुणानं स्वतःची दुचाकी पेटवली; व्हिडीओ व्हायरल
Jalna Protest : आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतांना देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान काल औरंगाबादच्या एका तरुणाने आपली चारचाकी पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच आज जालना येथील एकाने आपली दुचाकी पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर शनिवारी देखील झाला जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. तर, आज तिसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आले. दरम्यान, याचवेळी स्वराज्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष विकास जाधव याने स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल टाकत त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या मधोमध पेटवून दिली.
औरंगाबादेत तरुणाने स्वतःची कार पेटवली...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु असताना शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर याठिकाणी दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचं प्रकार समोर आला होता. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे एका तरुणाने स्वतःची चारचाकी पेटवून दिली आहे. शनिवारी फुलंब्री टी पॉइंट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली स्वतःची चारचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली. साबळे यांनी सुरुवातीला आपली कार रस्त्याच्या मध्यभागी आणून उभी केली. त्यानंतर खाली उतरवून पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच जालना येथील घटनेचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले होते. त्यांनी साबळे यांच्यासह इतर आंदोलकांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.
भोकरदन बंदची हाक...
अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आज भोकरदन शहर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आले. तसेच पोलीस प्रशासन आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर, या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकान बंद ठेवली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक