(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक
Nanded : नांदेड शहर आणि ग्रामीण भागात या बंदची हाक दिली गेली आहे.
नांदेड : जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन केले जात आहेत. अनेक ठिकाणी रस्ता रोको करून टायर जाळण्यात येत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली असतानाच, नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या सोमवारी (4 सप्टेंबर) रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नांदेड शहर आणि ग्रामीण भागात या बंदची हाक दिली गेली आहे.
जालना येथील पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी सकाळी सर्व समाज संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, निषेध सभा घेऊन जालना जिल्ह्यातील आपल्या भाषणातून निषेध नोंदवला. तसेच सोमवारी नांदेड जिल्हा बंद ठेवण्याचा यावेळी निर्णय झाला. त्यामुळे उद्या नांदेड जिल्हा बंद राहणार आहे.
शनिवारी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते गोळा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. तसेच जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित न केल्यास 4 सप्टेंबर रोजी नांदेड बंद पाळण्यात येईल, असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे. माहूरमध्ये शनिवारीच बंद पाळून टायर जाळत सरकारचा निषेध करण्यात आला. भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन निषेध केला. पुढील आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
आजही बस सेवा बंद...
जालना जिल्ह्यातील घटनेनंतर हिंसक आंदोलन सुरू झाल्याने काल एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. आज देखील नांदेड जिल्ह्यात एसटी बसेस बंद आहेत. जिल्ह्यांतील सर्वच आगारात बसेस बंद आहेत. आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता असल्याने बस सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर पुढील परिस्थिती पाहून पोलिसांच्या सूचनेनुसार बस सेवा सुरू केली जाणार असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
आजही अनेक ठिकाणी आंदोलन...
दरम्यान जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी देखील नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. जालना येथील घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच, अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही ठिकाणी बंद पाळण्यात आले. तर या सर्व पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांकडून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : जालन्यातील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक; उद्या औरंगाबाद बंदची हाक