Unseasonal Rain : जालना जिल्ह्यात 5 मेपर्यंत यलो अलर्ट; विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता
Unseasonal Rain in Jalna : या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
Unseasonal Rain in Jalna : जालना जिल्ह्यात (Jalna District) गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असतानाच आता आणखी एकदा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात शुक्रवार (5 मे) पर्यंत यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ताशी 30-40 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशात आता मे महिना सुरु झाला असताना देखील अवकाळी पाऊस काही थांबायला तयार नाही. त्यातच आता आणखी दोन दिवस जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 आणि 5 मे रोजी जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशासनाचे आवाहन….
- मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये.
- वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
- गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.
- ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे.
- मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये.
- सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे.
- वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे.
- जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
- शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
- बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवात्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत येथे संपर्क साधावा...
सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दुरध्वनी क्र. 02482-223132 या वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Unseasonal Rain: मराठवाड्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी; नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात जोरदार बरसला