Jalna News:जालन्यात सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू; पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले
Jalna News: दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पोहण्याचे आवाहन केले.

Jalna: जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. जुनेद सय्यद आसेफ (वय 19) आणि अयान सय्यद आसेफ (वय 15) अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. दोघेही तलावात पोहण्यासाठी गेले असताना पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे ते त्यात अडकले आणि काही क्षणांतच बुडाले. (Jalna News)
दोन्ही तरुणांची मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वाजून 14 मिनिटांना मोतीबाग तलावात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा कॉल आला. 16 ते 20 वर्षांचे दोन मुलं पोहताना बुडाल्याचं कळवण्यात आलं. घटनास्थळी पोहोचून लगेच कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरुवातीला साडेतीन-चार फूट खोल असलेले पाणी नंतर पावसाचा पाण्यामुळे वाढले. पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितलं. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पोहण्याचे आवाहन केले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दोघे भाऊ तलावाजवळ आले होते. पावसामुळे तलावात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती.मात्र, त्याची जाणीव नसल्याने ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. काही वेळातच त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहात हरवले. सुमारे दोन तास चाललेल्या शोधकार्यानंतर दोन्ही भावांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मराठवाड्यात तुफान पावसाची हजेरी
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगरासह उर्वरित भागात प्रचंड पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा टरबुज आणि कांदा पिकांना मोठा तडाखा बसलाय... यामुळे टरबुज आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत... लातूर जिल्ह्यातील दगडवाडी येथील शेतकरी उत्तम खोंड यांच्या दोन एकरातील टरबुजचे आणि चार एकरातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकरी विक्रम भोसले यांचेही दोन एकरातील टरबुज आणि तीन एकरातील कांद्याला पावसाचा तडाखा बसलाय..
या शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने जागेवरच सडून गेला असून, यामुळे त्यांचे जवळपास सहा ते सात लाखांचे नुकसान झालंय. मोठा आर्थिक खर्च करून पीक जोपासल्यानंतर ऐन काढणीच्या वेळी हातचे उत्पन्न गेल्याने सध्या हे शेतकरी चिंतेत असून, या संकटसमयी शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय.
हेही वाचा:























