जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ चारचाकी विहिरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू; गाडीत 12 लोक असल्याची शक्यता
Jalna Accident: गाडीतील अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारी वरून आले होते. जालना येथून ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी यामधून प्रवास करत होते.
जालना : जालन्यातील (Jalna Accident) राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. तुपेवाडी फाट्याजवळ चारचाकी विहिरीत कोसळली आहे. काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गाडीत 12 लोक असण्याची शक्यता आहे. तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जालन्यातून काही प्रवासी काळ्या- पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते. राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झला आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी-पिवळी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या विहीरीला कठडे नसल्याने जीप थेट विहिरीत गेली . जीप कोसळल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. 12 ते 15 प्रवासी असल्याची माहिती आहे. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
पंढरपूरहून भाविक आलेले भाविक घराकडे जात होते
गाडीतील अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारी वरून आले होते. जालना येथून ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी यामधून प्रवास करत होते. दरम्यान राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ या जीप वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन ही जीप कोसळली. ग्रामस्थ आणि पोलिसांकडून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत 6 मृतदेह हाती आली असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले या तिघांवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.