जालन्यात लाचखोर ग्रामसेवकाला 5 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार दंड
Jalana Crime news : जालना येथे दीड हजाराची लाच घेणं एका ग्रामसेवकास चांगलंच महागात पडलं आहे.
Jalana Crime news : जालना येथे दीड हजाराची लाच घेणं एका ग्रामसेवकास चांगलंच महागात पडलं आहे. तक्रारदारकडून 2 हजारांची लाच मागून दीड हजार रुपये स्वीकारताना एसीबीने ग्रामसेवकाला रंगेहात पकडले होते. या कारवाई प्रकरणी जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी ग्रामसेवकाला 5 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलीय. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या अंभोरा शेळके ग्रामपंचायती मध्ये 2 मे 2016 रोजी तक्रारदार आरोपी ग्रामसेवक यास कामानिमित्त भेटण्यासाठी गेला होता. फिर्यादी याचा वारसा हक्काचा फेर आणि वाटणी पत्रकाचा फेर घेण्यासाठी आरोपी ग्रामसेवक महेबुब मसुलदार याने तक्रारदारास दोन हजाराची मागणी केली. यावेळी फिर्यादीने लगेच 500 रुपये दिले, उर्वरित 1500 रुपये आरोपीने कागदपत्रासह घेऊन येण्यास देखील सांगितले. सदरची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली..
एसीबीची अशी झाली कारवाई -
तक्रारदाराला ग्रामसेवकाने सांगितल्या नुसार दीड हजारांची लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला यावेळी पंचा समक्ष आरोपी ने लाचेची मागणी करून 1500 रुपये स्वीकारले, दिनांक 3 मे 2016 रोजी आरोपी ग्रामसेवकास दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्या नंतर, या प्रकरणी जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी ग्रामसेवक महेबुब मासुलदार याला अटक करण्यात आलं,या प्रकरणी संपूर्ण दोषारोप दाखल झाल्या नंतर या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोषी ठरवत ग्रामसेवकाला ही शिक्षा सुनावली.
ग्रामसेवकास अशी झाली शिक्षा -
या प्रकरणी सरकार पक्षाकडून एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले,आज जालना जिल्हा व सत्र न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्या नंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आरोपी ग्रामसेवकास दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये 4 वर्ष कैद तर कलम 13 (2)अन्वये 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला,या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगायच्या असून दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावसाची शिक्षा ठोठावन्यात आली.