जालन्यात क्रिप्टोकरन्सीचा 500 कोटींचा घोटाळा, अनेकांची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशी करा; अर्जुन खोतकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Jalna: राज्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आला असल्याचं शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय.

जालना: जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे, तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी देखील लाखो लोकांनी यात गुंतवणूक केली असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देखील लिहिले असून आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अधिक पैशाचे अमिष दाखवून या करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली असून याचा मास्टरमाईड शोधला जावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक असताना त्यांनी करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला. गोरंट्याल यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत त्यांच्या देखील चौकशीची मागणी खोतकर यांनी केली आहे.
क्रिकेटपटू आणि अर्जुन खोतकरांचा जावई विजय झोल विरोधात गुन्हा
भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात उद्योजकाला गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी जालन्यातील घनसांगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विजय झोल याची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
विजय झोल याच्यावर नेमका आरोप काय?
उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली होती. परंतु या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड घरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटपटू विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
