Sanjay Garud : संजय गरुड यांचा भाजपत प्रवेश; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गिरीश भाऊ आता तुमचा सिनेमा..."
Sanjay Garud Joins BJP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड आणि जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Sanjay Garud मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड (Sanjay Garud) आणि जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत (Vilas Rajput) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना आता तुमचा सिनेमा 'हम साथ साथ है', आणि हा आता असाच चालुद्या, असे म्हटले.
यावेळी संजय गरुड म्हणाले की, आज प्रवेश होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. गिरीश भाऊंचे काम आम्ही पाहतो. जे काम त्यांनी केले आहे ते सर्व आमदारांनी करावे. अनेक कामे गिरीश महाजनांनी केली आहेत. गिरीश महाजन यांचा तुम्ही महाराष्ट्रात काय तर देशात हवे तिकडे उपयोग करा. ते नक्कीच चांगल्या मतांनी निवडून येणार असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना उद्देशून आज राम लक्ष्मणाची जोडी दिसत आहे, असे म्हटले.
फडणवीस आणि महाजन आपल्यासाठी परीस
संजय गरुड पुढे म्हणाले की, मला अनेक फोन आले की, कशाला जाताय तिकडे, काय आहे तिकडे. पण मी म्हणालो जिथे राहतो तिकडे श्रद्धेने, निष्ठेने राहतो. फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन हे आमच्यासाठी परीस आहेत. त्यांचा उपयोग देशासाठी करा ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील.
सुरक्षित घरट्यात आपले कार्यकर्ते राहावे
संकटकाळी धावून जाणारा माणूस आपला नेता आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. सुरक्षित घरट्यात आपले कार्यकर्ते राहावे, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे, असे संजय गरुड यांनी स्पष्ट केले. मात्र ते बोलताना शेवटी बोलताना थबकले आणि जय राष्ट्रवादी बोलता बोलता थांबले.
काय म्हणाले गिरीश महाजन?
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मी सांगू शकत नाही एवढा आनंद मला आज झाला आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आता आपण मुख्य प्रवाहात आलो आहे. भांडायच्या वेळी भांडलो. सगळ्यात प्रखर विरोध जर मला कोणाचा असेल तर... असे म्हणताच सभागृहात एकाच हशा पिकला. पण आता मी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता आपण तालुक्यासाठी काम करायचे आहे. जिल्ह्याचा विकास करायचा आहे.राज्याचा विकास करायचा आहे. सक्षम नेतृत्व आपल्या सोबत आहे.
"आम्ही एकत्र झालो. आज बघा आपल्यात सर्व मिसळून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आपल्यात आले.आता आपल्याला मिसळून काम करायचं आहे. आता मनात कोणी काही ठेवू नका. आपण आता एका छताखाली आहोत. आपला तालुका नंबर एकने निवडून आला पाहिजे. आपण एक मोठा मेळावा जामनेरला घेऊ. देवेंद्र फडणवीस पण त्या मेळाव्याला येतील. हा एक चित्रपट आहे, संजय गरुड आले म्हणजे. पण अजून चित्रपट बाकी आहेत. हा एकच पक्ष बाकी सर्व पक्ष बंद करुन टाकू", असेही गिरीश महाजन म्हणाले.
आता तुमचा सिनेमा हम साथ साथ है - देवेंद्र फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आताच गिरीश महाजन म्हणाले की, मोठा मेळावा आपल्याला जामनेरला घ्यायचा आहे. गिरीश भाऊ आता तुमचा सिनेमा हम साथ साथ है, आणि हा आता असाच चालुद्या. आधी हम आपके हे कोण असे होते. मी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करतो. आता गिरिश भाऊ, संजय नाना आल्यावर तुम्ही गरुड झेप घेणार आहात. आधी घेतचं होता. पण आता गरुड सोबत आला आहे.
तुम्ही आता गिरिश महाजन यांच्या पाठीशी आहात. आता त्यांच्या पाठी अजून काम लावून देतो. वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढणारे आज राज्याच्या आणि लोकांच्या हिताकरिता एकत्र येतात हा पॅटर्न आज इकडे दिसला. गरुड भाऊ तुम्ही योग्य निर्णय घेतला, हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रत्येक समूह घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे मोदी. योजना अनेक वेळा बनायच्या पण त्या जायच्या कुठे आणि कोणाचं भल व्हायचं? पण मोदीजींनी अशी एक व्यवस्था उभी केली की त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचल्या. लोक परिवर्तन बघत आहेत. मोदी २४ तास जनतेचा विचार करतात, असेही फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा