Nashik News : काँग्रेस, ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटाचाही नाशिक लोकसभेवर दावा, महाविकास आघाडीत बिघाडी होणार?
Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघावर याआधी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटानेही दावा केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nashik News नाशिक : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागलेत. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच प्रत्येक जागेवर दावेदारी वाढत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघावर (Nashik Lok Sabha Constituency) याआधी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटानेही यात उडी टाकली आहे.
लोकसभेची निवडणूक आता अवघ्या दीड दोन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. नाशिक मतदार संघावर सर्वच पक्षांकडून दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नाशिक दौऱ्यामुळे भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याचा भाजपला फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
नाशिकचे राजकीय महत्व वाढले
तसेच, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. ठाकरे गटाचे (Shivsena UBT) राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाने नाशिकमधूनच फुंकले. तसेच जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी नाशिकला हजेरी लावली. त्यामुळे नाशिकचे राजकीय महत्व गेल्या काही दिवसांपासून कमालीचे वाढले आहे. अशा परिस्थितीत नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानेही (NCP Sharad Pawar Group) आक्रमक बाणा अंगीकारला आहे.
नाशिक लोकसभेची जागा आघाडीत शरद पवार गटालाच मिळावी
शरद पवार गटाची जिल्हास्तरीय बैठक नाशिकमध्ये (Nashik) पार पडली. या बैठकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांची प्रमुख उपस्थिती होती. याच बैठकीत लोकसभा-विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून चर्चा झाली. नाशिक लोकसभेची जागा आघाडीत शरद पवार गटाला मिळावी, अशी एकमुखी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शरद पवार (Sharad Pawar) गटानेही उडी घेतली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटाने याआधी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटानेही नाशिकच्या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या