(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : सरसकट मिळत नसल्याचं काल गिरीश महाजन बोलले, आज जरांगे थेट जामनेरमध्ये पोहोचले
Manoj Jarange : जामनेरमध्ये जरांगे यांची आज सभा देखील होत आहे. त्यामुळे या सभेतून जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जळगाव: मराठा समाजाला सरसकट ओबीसी (OBC) मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. दरम्यान, महाजन यांनी काल हे वक्तव्य केलं आणि आज थेट जरांगे महाजन यांच्या जामनेरमध्ये पोहोचले आहे. मनोज जरांगे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जामनेरमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा जरांगे दौरा करणार आहेत. आज सकाळीच जरांगे यांचा ताफा जळगावच्या जामनेरमध्ये पोहोचला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आले. पंधरा ते वीस जेसीबीच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी परिसरातील मराठा समाजातील तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोबतच जामनेरमध्ये जरांगे यांची आज सभा देखील होत आहे. त्यामुळे या सभेतून जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जरांगे थेट जामनेरमध्ये पोहोचले
ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजातून होत असताना, गिरीश महाजन यांनी मात्र सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे वक्तव्य केला आहे. महाजन यांनी हे वक्तव्य रविवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्रकार परिषदेत केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज जरांगे पाटील थेट महाजन यांच्या जामनेरमध्ये पोहोचले आहे. आजच्या जामनेरच्या सभेमध्ये मनोज जरांगे यांच्याकडून गिरीश महाजन यांचा समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मनोज जरांगे हे गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: