(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगावची तरुणाई चिनी ई-सिगारेटच्या विळख्यात, ऑनलाईन आणि कुरिअरच्या माध्यमातून होतेय खरेदी
Chinese e cigarettes: शरीराला अत्यंत घातक ठरत असलेल्या चिनी ई-सिगारेटच्या आहारी जळगावातील उच्चभ्रू तरुणाई जात असल्याचं समोर येत आहे.
जळगाव : विदेशी सिगारेट पाठोपाठ आता चीनच्या ई-सिगारेटच्या (Chinese e cigarettes) विळख्यात जळगावातील तरुण सापडू लागली असल्याचा धक्कादायक माहिकी समोर येत आहे. त्यानुसार आता पोलिसांनी तपास सुरु केला असून यंत्रणा कामाला लावल्याची माहिती आहे. भारतात बंदी असलेल्या चिनी ई-सिगारेटचे उच्चभ्रू तरुणांमध्ये आकर्षण वाढत असून ऑनलाईन पद्धतीने कुरिअरच्या माध्यमातून जळगावमध्ये अशा प्रकारच्या चिनी ई-सिगारेट मागवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचं वातावरण पसरले आहे.
फॅशन म्हणून ई सिगारेटचं व्यसन
अलिकडच्या काळात अनेक तरुण फॅशन म्हणून विविध व्यसनाच्या आहारी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दारू सिगारेट, गांजा यासह विविध प्रकारच्या अमली पदार्थाचं सेवन करून आपलं व्यसन पूर्ण करण्याचा अनेक तरुण प्रयत्न करत आहेत. अशातच आता चिनी ई-सिगारेटचा विळखा तरुणाईला बसत आहे. जळगावमधील तरुणाई या चिनी ई सिगारेटच्या विळख्यात सापडत आहे.
काय आहे चिनी ई-सिगारेट
चिनी ई सिगारेट (Chinese e cigarettes) म्हणजे तंबाखू विरहित सिगारेट असते. यामध्ये पेनसारख्या वस्तूमध्ये लिक्विड स्वरूपात निकोटिन भरलेले असते. चार्जिंग सेलच्या माध्यमातून तरुण याची वाफ आपल्या तोंडात ओढून घेऊन नशा करत असतात. हा सिगारेटचा प्रकार अतिशय महाग असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना परवडत नाही. या व्यसनाच्या आहारी समाजातील उच्चभ्रू तरुण जात असल्याची माहिती मिळत आहे.
ई सिगारेटमध्ये निकोटिन थेट लिक्विड स्वरूपात शरीरात ओढले जात असल्याने त्याचे शरीरावर घातक दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त आहे. या मध्ये श्वसनाच्या आजारासह कॅन्सरचा धोका असल्याने या ई-सिगारेटपासून तरुणांनी दूर राहणे गरजेचे आहे.
ऑनलाईन पद्धतीने ई सिगारेटची मागणी
जळगावमध्ये कोणताही अधिकृत सिगारेट विक्रेता या चिनी ई सिगारेटची विक्री करत नसला तरी ऑनलाईन पद्धतीने कुरिअरच्या माध्यमातून मात्र अशा प्रकारच्या सिगारेट या जळगावमध्ये मागवल्या जात असल्याचं समोर येत आहे.
जळगावमध्ये बेकायदेशीररित्या चिनी ई सिगारेट मागविल्या जात असल्याची माहिती माध्यमांमधून मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या संदर्भात पोलिसांनी आपल्या तपास यंत्रणा कामाला लावल्या असून यात कोणी दोषी आढळून आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचा: