(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, टोल नाक्यावर बोगस पावत्या देऊन लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश
jalgaon news : जळगावमध्ये पोलीस अधिक्षकांच्या पथकाने साध्या वेशात धाड टाकून टोलनाक्यावरील बोगस पावत्या देऊन वाहनधारकांची लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.
Jalgaon News Update : जळगाव जिल्ह्यातील नशीराबाद टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने साध्या वेशात धाड टाकून टोलनाक्यावर बोगस पावत्या देऊन वाहनधारकांची लूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी टोलनाका मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.
आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महामार्गावरील नशीराबाद टोलनाक्यावर वाहनधाकांना बनावट पावत्या देण्यात येवून शासनाची फसवणूक केली जात असल्याची तक्रार पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी टोलनाक्यावर छापा टाकला. साध्या वेशातील पोलीस पथक वाहनधारक बनून गेले. यावेळी टोल नाक्यावर पैसे दिल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्या बनावट असल्याचं लक्षात आले. त्यामुळे पथकाने कारवाई केली.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुला फुला, पोलीस उपनिरिक्षक सुनिल चोधरी, हेडकॉन्स्टेबल प्रविण पाटील, सचिन विसपुते, पोलीस शिपाई अजमल बागवान, भारत डोखे, आसिफ तडवी यांच्या पथक गुरुवारी कारवाईसाठी टोलनाक्यावर पोहचले. कारवाईबाबत अंत्यत गोपनीयता ठेवण्यात आली होती. कारवाईबाबतची कुणालाही कानोकान खबर न लागता साध्या वेशात पोलीस अधीक्षकांचे पथक वाहनधारक बनून टोलनाक्यावर धडकले.
पथकातील कर्मचाऱ्याने टोल भरण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर त्यांना पावती देण्यात आली. मात्र ही पावती बोगस असल्याची खात्री झाल्यावर पावती देणाऱ्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी दोन मशीन जप्त केल्या असून टोलनाक्यावरील मॅनेजरसह पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पंचनामा करुन नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आरटीआय कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने गुरुवारी टोलनाक्यावर कारवाई केली आहे. यात बनावट पावत्या दिल्या जात असल्याचे समोर आले असून दोन मशीन तसेच पाच ते सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर रित्या याप्रकरणात शासनाची फसवणूक केल्यासह विविध कलनामन्वये नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली.