Gulabrao Patil : 'आम्हाला न्याय देणे तुमच्या हातात, पण हे विसरु नका, 2024 निवडणूक आमच्या हातात', आंदोलक गुलाबराव पाटलांवर कडाडले!
Jalgaon News : 'कानात कुजबुजू नका, काय ते खुली चर्चा करा, 2024 ची निवडणूक आमच्या हातात' असा इशारा गुलाबराव पाटील यांना आंदोलकांनी दिला आहे.
जळगाव : 'आम्हाला न्याय देणं...तुमच्या हातात आहे, पण..विसरू नका..2024 ची निवडणूक आमच्या हातात आहे', असा थेट इशारा आंदोलनाला बसलेल्या कोळी समजा बांधवांच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आला. यावेळी तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मी तुमच्या सोबत आहे, असं आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. यानंतर मात्र कार्यकर्त्याचा आवेश कमी झाल्याचं पाहायला मिळाले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी कोळी समाज बांधवांचे आंदोलन सुरु आहे. यात जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आदिवासी कोळी बांधव मागण्यासंदर्भात बैठक होऊन त्यात सकारात्मक चर्चा झाली. यानंतर उपोषण सोडवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आंदोलनस्थळी पोहचले. मात्र सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसल्याने सांगत एका कोळी समाज कार्यकर्त्याने आक्रमक होत मंत्री गुलाबराव पाटील यांना इशारा दिला.
यावेळी आंदोलक म्हणाले की, 'आम्हाला न्याय देणे तुमच्या हातात आहे, नाही तर विसरु नका 2024 निवडणूक आमच्या हातात आहे', असा इशाराच दिला. यावर गुलाबराव पाटील यांची सामंजस्याची भूमिका घेत आक्रमक झालेल्या या कोळी समाज बांधवाला उद्देशून म्हणाले की, 'आम्ही काय तुमचे दुश्मन आहे का...दोन तीन वेळा मी भेट दिली. आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. परत तुमच्या मागण्या संदर्भात पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय काढला जाईल. तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मी तुमच्या सोबत आहे, अस आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. यानंतर मात्र कार्यकर्त्याचा आवेश कमी झाल्याचं पाहायला मिळाले आहे.
आंदोलक भूमिकेवर ठाम
कोळी बांधवांच्या सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात शनिवारी पालकमंत्र्यांना अपयश आले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी तासभर बैठक घेत आश्वासन दिल्यानंतरही आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर बोट ठेवले. आणि 'कानात नको, खुली चर्चा करा' अशा शब्दात आंदोलनकर्त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शासन आदेशाची प्रत हाती पडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार अशी स्पष्ट भूमिका मांडली. तर मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांविषयक सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केली असून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले. तेव्हा काही जणांनी 'तुम्ही मुंबईत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला का उपस्थित नव्हते', असा सवाल केला. बैठकीचा निरोप रात्री 12 वाजता मिळाला. त्यावेळी मी मुंबईहून जळगावकडे येत होतो. लगेचच परतणे शक्य नव्हते, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकीत ऑनलाईन संवाद साधला आणि मागण्या मांडल्या, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
इतर महत्वाची बातमी :