(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Price Hike : जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर
Gold Price Hike: गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव 62000 रुपयांवर पोहचले आहेत.
Gold Price Hike: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही (Gold Price) कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दोनच दिवसात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने 62 हजारांवर उसळी घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव 62000 रुपयांवर पोहचले आहेत. जागतिक पातळीवर अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी बँकामधील पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
जळगावात सोने 62000 रुपये
जळगावच्या सुवर्ण नगरीत कधी नव्हे ते जीएसटीसह सोने 62000 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. काल हाच दर दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 59800 होता. तर आज हेच दर 60200 आणि जीएसटीसह 62006 रुपयांवर पोहचला आहे.येत्या काळात अजूनही सोन्याच्या दरात वाढ होईल असा सोने व्यावसायिकांचा अंदाज आहे.
सणासुदीच्या तोंडावर सोने महागले
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहे. ग्राहकांना आपल्या बजेटपेक्षा कमी सोने खरेदी करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे सोनं खरेदीचीही रेलचेल सुरू झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दोन दिवसावर गुढीपाडवा आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला अन् लग्नसराईच्या ऐन मौसमात सोन्याचे भाव वधारलेले पाहायला मिळतील. काल सोन्याच्या भावांनी 60 हजार रूपयांचा टप्पा पार केला होता आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दागिन्यांची शुद्धता कुठे तपासाल?
दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.