Jalgaon News : जळगावच्या सिमेंट व्यापाऱ्याने केंद्र सरकारला भरभरुन चुना लावला, 65 कोटींची खोटी बिलं देऊन साडेबारा कोटींची फसवणूक
Jalgaon News : खोटी बिले देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
Jalgaon News जळगाव : खोटी बिले (Fake Bills) देऊन शासनाची (Government) कोट्यावधी रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या व्यापाऱ्यास, राज्य जीएसटी (GST) जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नामदेव धनगर (Namdeo Dhangar) नावाचा व्यापारी सिमेंट व्यवसाय करत असल्याचे दाखवून त्या माध्यमातून खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची फसवणूक करत असल्याचे जीएसटी विभागाच्या अन्वेषण शाखेच्या नजरेस आले होते. या व्यापाऱ्यावर तब्बल दोन महिने पाळत ठेवून, पुरेसे पुरावे हाती येताच नामदेव धनगर याला अटक करण्यात आली आहे.
मालाची विक्री न करता खोटी बिले केली सादर
याबाबत अधिक माहिती अशी की, महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला होता.
शासनाची कोट्यावधींची फसवणूक
नामदेव दौलत धनगर याने तब्बल 65 कोटीची खोटी बिले देऊन शासनाची 12.65 कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे नामदेव धनगर याला महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने धनगरला १४ दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वर्षभरातील सातवी अटक
दरम्यान, या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असून प्रकरणातील इतर संबंधितांवरही लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची आर्थिक वर्षातील ही सातवी अटक असून विभागाने खोट्या कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या