(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture : पीक विमा योजनेला एक वर्षासाठी मान्यता; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
खरीप हंगामासाठी ही योजना आहे. नागपूर-वर्धासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि तर भंडारा-गडचिरोलीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी आणि गोंदिया-चंद्रपूरसाठी एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि. आहे.
नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेस केंद्र शासनाने एक वर्षासाठी मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगामासाठी 31 जुलै 2022 अशी आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे.
योजना कार्यान्वित यंत्रणा
खरीप हंगामासाठी ही योजना नमूद केलेल्या विमा कंपनी कडून संबंधित जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. नागपूर व वर्धासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि तर भंडारा व गडचिरोलीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी व गोंदिया व चंद्रपूरसाठी एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि. आहे.
खरीप हंगामासाठी जोखीमेच्या बाबी
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान , खरीप हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्व साधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण मिळते.
पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट आली असेल तर अधिसूचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळते.
पिक पेरणी पासून काढणीपर्यंत कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट टाळता न येणाऱ्या उत्पादनातील घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकांतील पिक कापणी प्रयोगावरुन उपलबध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई मिळते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती
नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गरपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झााल्यास होणारे अधिसूचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येतात.
पीक काढणी पश्चात नुकसान
ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडण्याच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पाऊस आणि अवकाळी पावसामुळे नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीमेंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सव्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंस ॲप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्रि क्रमांक, बँक कृषी व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र यांचा तपशील कळविणे बंधनकारक आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा व न होण्याचा पर्याय उपलब्ध असून शेतकरी इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याचा अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरीता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. योजनेमध्ये विविध जोखीमेंतर्गत होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्चित केले जाते. हंगामात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पनांशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.