Wrestlers Protest: 22 दिवस झाले भाजपचा एकही नेता फिरकला नाही; कुस्तीपटू आता महिला खासदारांना लिहिणार पत्र
Wrestlers Protest: लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवली आहे. आता कुस्तीपटू भाजपच्या महिला खासदारांना पत्र लिहिणार आहे.
Wrestlers Protest: जवळपास तीन आठवड्यापासून धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या धरणे आंदोलनाकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने म्हटले की, उद्या आम्ही भाजपच्या महिला खासदारांना पत्र लिहिणार असून आमच्या मुद्यांवर मदत मागणार आहोत. समाजातील सर्व लोकांच्या सहकार्याची गरज असल्याचे तिने म्हटले. आम्ही करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन साक्षी मलिकने केले आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी सर्वांनी आपआपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे आणि 16 मे रोजी सत्याग्रह करावा असे आवाहन केले आहे.
ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघ विसर्जित केल्याचे आम्ही स्वागत करतो, असे कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले.
बृजभूषण शरण सिंह यांचा जबाब नोंदवला
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी बृजभूषण शरण सिंह यांचा जबाब नोंदवला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते.
एसआयटीची स्थापना
पहिली एफआयआर एका अल्पवयीन व्यक्तीने केलेल्या आरोपांशी संबंधित आहे. ज्यामध्ये POCSO कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी, दुसरी एफआयआर ही प्रौढ महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.