Wrestlers Protest: 'जिथे पोलीस अडवतील त्याच जागी थांबा', बजरंग पुनियाचे लोकांना आवाहन
Wrestlers Protest: दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला आता देशभरातून समर्थन मिळत आहे. आज बरेच लोक या आंदोलनाला भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Wrestlers Protest: देशाची राजधानी दिल्लीमधील (Delhi) जंतर-मंतर याठिकाणी कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Protest) सध्या सुरु आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनला देशभरातून चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. आधी राजकिय नेत्यांनी, सामाजिक संस्थांनी या आंदोलनाला भेट दिली होती. तसेच आता कृषी संघटनांनी (Kisan Morcha) आता दिल्लीच्या जवळपासच्या राज्यातून जंतर-मंतरकडे प्रस्थान केले आहे. महिला शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीच्या टिकरी सिमेवर पोहचले आहेत. आज संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित काही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहचण्याची शक्यता आहे. तसेच किसान मोर्चाचे काही नेते देखील जंतर-मंतर येथे पोहचण्याची शक्यता आहे. यादरम्यान कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे.
आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आंदोलनाला समर्थन मिळत असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'आजही इथे काही लोक येतील,परंतु किती लोकं येणार आहेत हे निश्चित सांगता येणार नाही. मी सगळ्यांना आवाहन करतो की, हे आंदोलन शांततेत करायचं आहे, त्यामुळे पोलीस जिथे अडवतील तिथेच थांबा' असे बजरंग पुनिया याने म्हटलं आहे. पुढे बोलताना बजरंग पुनियाने म्हटले की, 'जंतर-मंतरवर असलेल्या सर्व महिला आणि मुलींच्या पाठीशी सगळेजण खंबीर उभे आहेत'. बजरंग पुनियाचे हे विधान प्रकर्षाने जाणवून देते की या आंदोलनाला आता मोठे स्वरुप प्राप्त होणार आहे. ज्याप्रमाणे कृषी संघटनांनी वेगाने दिल्लीच्या दिशेने कुच करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आंदोलनाचे स्वरुप बदलताना दिसत आहे. त्यामुळे आता या आंदोलनात अनेक राजकिय नेते देखील चित्र पहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कलम 144 लागू
वृत्तानुसार, दिल्लीला जोडणाऱ्या सगळ्या सीमांवर दिल्ली पोलीसांच्या तसेच सीआरपीएफचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. पोलीस सर्व सीमांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच अनेक जागांवर पोलीसांनी कलम 144 देखील लागू केले आहे.
माहितीनुसार, भारतीय किसान संघ आणि संयुक्त किसान मोर्चा तसेच अजून बऱ्याच संघटना जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी पोहचणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये राकेश टिकैत, हन्नान मोल्ला, दर्शनपाल, युधवेंद्र सिंग आणि अनेक संघटनांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. यादरम्यान भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, 'या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे'.