(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway PNR : रेल्वे तिकिटावरील PNR चा अर्थ काय? त्यात लपलेला कोड काय सांगतो?
Railway PNR : भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी असून त्या माध्यमातून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. रेल्वेच्या बुक केलेल्या तिकिटावर 10 अंकी PNR नंबर असतो.
मुंबई : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. त्यातून दररोज कोट्यवधी प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. भारतीय रेल्वेचा एकूण ट्रॅक 68 हजार किलोमीटरहून अधिक लांब आहे. याशिवाय 7,325 स्थानकांवर सुमारे 13,200 प्रवासी गाड्या धावतात. पण जेव्हा तुम्ही प्रवासासाठी तिकीट बुक करता तेव्हा त्यात पीएनआर क्रमांक (Railway PNR) असतो. त्याचा नेमका अर्थ काय असतो ते जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी लोक प्रवास करत असल्याने ऐनवेळी त्याचे तिकीट मिळणे अवघड होतं. कधी-कधी ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे काही महिने आधीच लोक तिकीट बुक करतात. त्या बुक केलेल्या तिकीटावर एक पीएनआर नंबर असतो. खूप कमी प्रवाशांना माहित आहे की हा 10 अंकी नंबर त्यांच्या प्रवासात खूप मदत करू शकतो.
What Is Railway PNR : पीएनआर नंबरचा अर्थ काय?
PNR क्रमांकाचे पूर्ण स्वरूप म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड (Passenger Name Record). त्याच्या नावाप्रमाणेच या क्रमांकावर प्रवाशांची सर्व माहिती नोंदवली जाते. आरक्षणाच्या वेळीच प्रवाशांसाठी हा क्रमांक तयार केला जातो.
पीएनआर क्रमांकावरून माहिती उपलब्ध
कन्फर्म सीट जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएनआर नंबरची मदत घेऊ शकता. हा क्रमांक जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइटवर क्लिक करा. यानंतर तुम्ही ऑनलाईन पीएनआर नंबर या पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता. याशिवाय तुम्ही मोबाईलवर एसएमएसद्वारे पीएनआर नंबरच्या मदतीने ट्रेनची स्थिती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक रेल्वे क्रमांक 139 वर पाठवावा लागेल.
PNR चे 10 क्रमांक काय सांगतात?
पीएनआरच्या 10 अंकांपैकी पहिले तीन क्रमांक हे सांगतात की प्रवाशाने कोणत्या झोनमधून आरक्षण केले आहे. जसे मुंबई झोन क्रमांक 8 आहे आणि आरक्षण मुंबई ते दिल्ली आहे, तर तुमचा पीएनआर क्रमांक 8 पासून सुरू होईल आणि उर्वरित दोन क्रमांक देखील झोनबद्दल सांगतात. यानंतर ट्रेनचा क्रमांक, प्रवासाची तारीख, प्रवाशांचे तपशील इत्यादी माहिती 7 क्रमांकावर टाकली जाते.
यासोबतच तुमचा प्रवास कोणत्या स्थानकावरून सुरू होईल आणि कुठे संपेल याचीही माहिती या क्रमांकांमध्ये देण्यात आली आहे. AC 1, AC 2, AC 3, Sleeper याप्रमाणे तुम्ही कोणत्या वर्गात प्रवास करत आहात याची माहितीही त्यात नोंदवली जाते.
ही बातमी वाचा :