Mamata Banerjee Meets Gautam Adani : ममता बॅनर्जीं आणि गौतम अदानींची भेट; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा
Mamata Banerjee Meets Business Tycoon Gautam Adani : ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी अद्योजक गौतम अदानी यांची भेट घेतली. यावेळी बंगालमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.
Mamata Banerjee Meets Business Tycoon Gautam Adani : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी राज्य सचिवालय 'नबन्ना'मध्ये अदानी समुहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी यांची भेट घेतली. या बैठकीत ममता बॅनर्जी आणि गौतम अदानी यांनी बंगालमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तसेच अदानी यांनी पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याची पुष्टीही केली आहे. ममता बॅनर्जी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील बैठक सुमारे दीड तास चालली. ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरून परतल्यानंतर ही बैठक झाली.
ममता बॅनर्जींसोबतच्या बैठकीनंतर गौतम अदानी यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, "माननिय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून आनंद झाला. त्यांच्याशी गुंतवणुकीची विविध परिस्थिती आणि पश्चिम बंगालच्या मोठ्या क्षमतेबाबत चर्चा केली. मी एप्रिल 2022 मध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस कॉन्फरन्स (BGBS) मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे." सचिवालयाच्या सूत्रांनुसार, ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते.
दरम्यान, बिजनेस समिटबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बिझनेस समिटसंदर्भात इतर पक्षांच्या नेत्यांच्या सतत भेटी घेत आहेत. ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना आमंत्रित केले होते. नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे, प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांची भेट घेतली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजप विरोधात तिसरी आघाडी होणार?
ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे, संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाणूनबुजून शरद पवारांची भेट टाळल्याचं बोलंलं जात होतं. राजकीय चर्चांमध्ये तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. मोदींचं वाराणसीत आपला जम बसवण्याच्या प्रयत्न ममता यांचा असणार आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा