(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली, भवानीपुरातून 58 हजार मतांनी विजयी
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भवानीपूरमधून त्यांनी 58 हजार मतांनी मोठा विजय मिळवला आहे.
कोलकाता : तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचली आहे. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्यावर तब्बल 58 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा करायला सुरुवात केली असून ममता बॅनर्जींचे घर आणि पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
ममता बॅनर्जी यांना 1 लाख 15 हजार मतं मिळाली आहेत. दक्षिण कोलकात्याचा भाग असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील सर्व वार्डातून ममता बॅनर्जी यांना मताधिक्य मिळालं आहे हे विशेष. इतक्या मोठ्या मताधिक्यांने मिळालेला हा विजय एक विक्रम आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ज्यावेळी 12 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोश सुरु केला. या मतमोजणीमध्ये एकूण 21 राऊंड होते.
भवानीपूर मतदारसंघासाठी 57 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास यांचं आव्हान होतं.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला होता. यामध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूलला घवघवीत यश मिळालं असलं तरी स्वत: ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजे भवानीपूरमधून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिलं. या ठिकाणचे आमदार सोभन देव चटोपाध्याय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ममतांची वाट मोकळी करुन दिली.
या आधी ममता बॅनर्जी यांनी भवानीपुरातून दोन वेळा विजय प्राप्त केला होता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना आपल्या बालेकिल्ल्याचा आधार घ्यावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या :