Gautam Adani : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा अटकेत, मग गौतम अदानी का ट्रेन्ड होतायंत?
Cruise Drugs Party प्रकरणी एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केलीय. पण ट्विटरवर (Twitter Trending) गौतम अदानी (Gautam Adani) ट्रेन्ड होतायंत.
मुंबई : एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली असून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. एनसीबीने या क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. पण या प्रकरणी सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली असून ट्विटरवर गौतम अदानी ट्रेन्ड होतायंत.
ट्विटरवर नेटिझन्सकडून आता या प्रकरणाचा संबंध उद्योगपती गौतम अदानींशी दोन प्रकारे लावण्यात येतोय. पहिलं म्हणजे काही दिवसांपूर्वी गौतम अदानींच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून तब्बल तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. मग मुंबईत येणारं ड्रग्ज हे अदानींच्या मालकीच्या पोर्टवरून आलं आहे का असा सवाल अनेकांनी विचारला आहे.
दुसरं म्हणजे एनसीबीने काल केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. त्यावरुन सगळीकडे मोठी चर्चा सुरु आहे. एनसीबीने शाहरूखचा मुलगा आर्यनला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पण अदानींच्या मालकीच्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरून अफगाणिस्तानवरुन येणारे तीन हजार किलो ड्रग्ज पकडल्यानंतरही त्यावर पुढे काय कारवाई करण्यात आली याची कुणालाही माहिती नसल्याचं नेटिझन्स म्हणतात.
ड्रग्ज हे ड्रग्ज असतं, त्यामुळे कित्येकांचं आयुष्य बरबाद होतं. मग कुठेतरी 100 ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर जी कारवाई केली जाते ती मग तब्बल तीन हजार किलो ड्रग्ज सापडल्यावर का केली जात नाही असा सवाल नेटिझन्स विचारला जात आहे.
Cruise Party : क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात, चौकशी सुरू
एनसीबीनं काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन खान क्रुझवर उपस्थित होता. त्यामुळे त्याची चौकशी सुरु आहे. आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. काल रात्री एनसीबीने या क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे.
अदानींच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवरून तीन हजार किलो ड्रग्ज जप्त
अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरुन 15 सप्टेंबरला तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल 15 हजार कोटी रुपये किंमतीचे असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं करण्यात आली होती.
डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सला (DRI) मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी गुजरातमधील कच्छ भागातील मुंद्रा या पोर्टवरुन 2,988 किलो अफगाणी हिरॉईन जप्त केलं. दोन कन्टेनरमधून भरुन आलेल्या या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली आहे.
Sameer Wankhende: ड्रग माफियांचा कर्दनकाळ असलेला अधिकारी, कोण आहेत समीर वानखेडे?