Weather Update : शिमलासह मनालीमध्येही बर्फवृष्टी, काही ठिकाणी पावसाचा अंदाज; आज देशभरात हवामान कसे असेल?
Weather Update : एकीकडे पर्वतीय राज्यांमध्ये सतत बर्फवृष्टी सुरू असून, दुसरीकडे मैदानी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच उत्तरेककडील भागात थंडीची काहीशी कमी झाली आहे.
India Weather Update : देशात एकीकडे बर्फवृष्टी (Snowfall) होताना दिसत आहे, तर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान खात्याने वर्तवली आहे. पर्वतीय भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्याने बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 26 जानेवारीपूर्वी मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशामध्ये बर्फवृष्टी
शिमल्यात बर्फवृष्टी सुरुच आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. एकीकडे पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हा चांगला हंगाम मानला जात आहे. तर दुसरीकडे, बर्फवृष्टीमुळे लोकांनाही काही समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. गेल्या 18 ते 20 तासांपासून संपूर्ण जिल्ह्यात बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग बंद झाले आहेत, तर इतरही 45 रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद आहेत.
हिमाचलमध्ये थंडी आणखी वाढणार
हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट वाढली आहे. राज्यात आणखी सहा दिवस खराब हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीपर्यंत राज्यात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. मात्र, 21 आणि 22 जानेवारीला सखल आणि मैदानी भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 24 जानेवारीला मध्य आणि उंच पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिमेकडील वाऱ्यांचा परिणाम
पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे भारतात हवामानात बदल होताना दिसत आहे. पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरुच आहे. उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये थंडीची लाट कमी झाली आहे आणि पुढील पाच दिवसांत थंडीच कहर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तसेच, दक्षिण हरियाणा, पूर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात थंडीची लाट कायम आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 22 जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
थंडीपासून दिलासा मिळणार, हवामान विभागाकडून पाच दिवसांचा अंदाज जाहीर; 'या' भागात पावसाचा इशारा