थंडीपासून दिलासा मिळणार, हवामान विभागाकडून पाच दिवसांचा अंदाज जाहीर; 'या' भागात पावसाचा इशारा
Weather Update : उत्तर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. पुढचे पाच दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांन दिलासा मिळणार आहे.
Weather Update News : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. अशातच उत्तर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. पुढचे पाच दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 22 जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
20 ते 22 जानेवारीपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशात हवामान कोरडे
20 ते 22 जानेवारीपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहिल. दुसरीकडे, 23 जानेवारी रोजी राज्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडू शकतो. दुसरीकडे 24 आणि 25 जानेवारी रोजी राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेशात 21 जानेवारीच्या पहाटे पाऊस किंवा बर्फ सुरु होण्याची शक्यता आहे. तर 24 जानेवारीपासून जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे
येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेशात येत्या पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होणार आहे. मात्र, येत्या 24 तासात त्यात कोणताही बदल दिसणार नाही. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे 23 ते 26 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात गारपिटीचीही शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: