(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather : महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला, तर उत्तर भारतात पावसामुळं पुन्हा थंडीचा कडाका
शुक्रवारी हवामानात बदल झाला आहे. काल रात्री दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे.
Weather Update : गेल्या काही दिवसापासून उत्तर भरतामध्ये तापमानात वाढ होत होती. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. त्यामुळे थंडी गायब झाल्याचे बोलले जात होते. पण शुक्रवारी हवामानात बदल झाला आहे. काल रात्री दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान, वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे.
दिल्लीतील द्वारका, उत्तम नगरसह अनेक भागात काल रात्री मुसळधार पावसासह गारपीट झाली. हवामानातील या बदलाची स्थिती भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या पावसाचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. ज्यामुळे राजधानीचे हवामान बदलले आणि शुक्रवारी संध्याकाळी रात्री जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आज दिल्लीत हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर थंडी जाणवेल. रविवारपासून हवामान स्वच्छ राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारताच्या काही भागांवर वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. त्यामुळे आज पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तसेच, या गडबडीमुळे नैऋत्येचे वारे पुढे सरकतील. त्यामुळे आज ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारताच्या राज्यांवर ढगांचे आच्छादन राहू शकते. त्यामुळे पुढील 24 तासात येथे हवामान सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आज दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडूमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
डोंगराळ भागात पाऊस
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज उत्तर भारतातील डोंगराळ भागात पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, कुलगाम, काझीगुंड, पहलगाम ते कटरा, उधमपूरसह सीमावर्ती भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तराखंडमधील पिथौरागढच्या भागात पाऊस पडल्यानंतर आजही खराब हवामानाची शक्यता आहे. सखल भागात, हृषिकेश आणि हरिद्वार, नैनितालमध्ये ढग असतील त्यामुळे तिथे पावसाची शक्यता आहे. गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद आणि लडाखमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis : भारतातील जवळपास 16 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पाहा कोणत्या राज्यातील किती नागरिक?
- Sambhaji Raje Chhatrapati Protest : मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण