Weather Update : देशभरात हवामानात सातत्याने बदल, राज्यात उकाड्यात वाढ, कुठे होणार पाऊस? हवामानाचे ताजे अपडेट जाणून घ्या
Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. यामुळे विदर्भात पुन्हा पाऊस हजेरी लावणार असल्याचं समोर आलं आहे.
Weather Update : सध्या देशभरात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात थंडी जवळपास गायब झाली असून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊ लागली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली असून हवामानात बदल दिसत आहे. याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. या संदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) एक अपडेट जारी करून सांगितले की, पुढील 3 दिवस उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील स्थिती पाहता पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये दिवसा तापमानाचा पारा 35 डिग्री सेल्सिअसवर पोहोचत आहे. त्यामुळे उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या
5 राज्यांत गारपिटीचा इशारा
IMD नुसार, 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत देशातील काही भागात पाऊस सुरू राहील. 5 राज्यांमध्ये अनेक भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला असून या भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत हवामानात लक्षणीय बदल होणार असून ढगाळ वातावरण राहील, असे हवामान खात्याने आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे. या काळात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पुन्हा पाऊस हजेरी लावणार? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ?
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 25 आणि 26 फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे महाराष्ट्रात आर्द्रता घेऊन येणार आहेत. त्यामुळे, याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसणार आहे. यामुळे विदर्भात पुन्हा पाऊस हजेरी लावणार असल्याचं समोर आलं आहे. 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात 27 फेब्रुवारीला ढगाळ वातावरणाबरोबर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येत्या 24 तासात कुठे काय होणार?
हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टीची तीव्रता लक्षणीय प्रमाणात कमी होईल, परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत ती कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>>
Weather Update : पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाची शक्यता, IMD ने या भागात वर्तवला पावसाचा अंदाज