एक्स्प्लोर
देशातलं असं गाव, जिथं फक्त कोट्यधीश राहतात...
भारतीय लष्कराला गॅरिसन बनवण्यासाठी बोमाजामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं. त्याच्या मोबदल्यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मुक्तो या आपल्या मतदारसंघातील लोऊमधील आयोजित कार्यक्रमात 31 जणांना जमिनीच्या मोबदल्याचं वाटप केलं.

फोटो सौजन्या : अरुणाचल प्रदेश सरकार वेबसाईट
नवी दिल्ली : भारताचा ग्रामीण भाग म्हणजे मागासलेला, असा आपल्याकडे समज असतो. म्हणूनच ग्रामीण भागाची गरीबी दूर करण्यासाठी महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा मंत्र दिला होता. पण तुम्हाला कुणी सांगितलं की, भारतात असंही एक गाव आहे, जिथे फक्त कोट्यधीश राहतात, तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यातील बोमाजामध्ये हे सत्यात उतरलं आहे. भारतीय लष्कराला गॅरिसन बनवण्यासाठी बोमाजामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं. त्याच्या मोबदल्यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मुक्तो या आपल्या मतदारसंघातील लोऊमधील आयोजित कार्यक्रमात 31 जणांना जमिनीच्या मोबदल्याचं वाटप केलं. तब्बल 200.056 एकर जमिनीसाठी सरकारने तब्बल 40 कोटी 80 लाख 38 हजार चारशे रुपयांच्या चेकचं वाटप केलं. यातील सर्वाधिक रकमेचा चेक 6 कोटी 73 लाख 29 हजार 925 रुपयांचा होता. तर त्या खालोखाल दोन कोटी 44 लाख 97 हजार 886 रुपयाचा चेक संबंधित जमीन मालकाकडे सुपूर्द करण्यात आला. उर्वरित 29 जणांना प्रत्येकी एक कोटी नऊ लाख तीन हजार 813 रुपयाच्या चेकचं वाटप करण्यात आलं. दरम्यान, जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्याला नुकतीच मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानले. तसेच, लष्करासाठी इतर आरक्षित जमिनींच्या अधिग्रहणाबदल्यात देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना पेमा खांडू यांनी पंतप्रधान मोदींचा कामकाजाची स्तुती केली. केंद्राच्या सहकार्यामुळे राज्याचा झपाट्याने विकास होत आहे. रेल्वे, विमान, डिजिटल तसेच रस्त्यांचे जाळं वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच तवांग जिल्हाही लवकरच रेल्वे मार्गाने जोडला जाईल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.
आणखी वाचा























