पश्चिम रेल्वे मार्गावर प्रथमच महिलांनी चालवली मालवाहू रेल्वे
मुख्य लोको पायलट होवून त्यांनी ५ जानेवारीला पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकातून मालवाहतून गाडी चालवली. ही गाडी त्यांनी ६ जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचवली.
वसई : प्रत्येक क्षेत्रात किंबहुना अनेकदा असाध्य वाटणाऱ्या वाटा निवडत ध्येय्यपूर्तीचा ध्यास अनेक महिला उराशी बाळगतात. त्याच्या पूर्ततेसाठी अथक परिश्रमही घेतात. या साऱ्यातच्या शेवटी गवसणारं यश सारं काही सांगून जातं. सध्या अशाच काही महिलांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर कोणी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहे. यामागं कारणही तसंच.
रेल्वेच्या इतिहासात प्रथमच पश्चिम रेल्वे मार्गावर महिलांनी मालवाहतूक रेल्वे चालवली आहे. लोको पायलट कुमकुम सूरज डोंगरे, सहाय्यक लोको पायलट उदिता वर्मा आणि गार्ड आकांक्षा राय अशी या महिलांची नावे आहेत. ५ जानेवारी रोजी मुंबईच्या वसई रोड स्थानकातून या गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. यातील लोको पायलट कुमकुम डोंगरे या वसई मध्ये रहात असून, सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कुमकुमही एखाद्या सर्वसामान्य गृहिणीप्रमाणं त्यांची घरातील सर्व जबाबदारी पार पाडतात. मुळच्या मध्यप्रदेशच्या राहणा-या कुमकुम या पश्चिम रेल्वे मार्गावर मालवाहतूक रेल्वे चालवणा-या महिला महिला ठरल्या आहेत. दिनांक ३० ऑक्टोंबर २०१३ मध्ये रेल्वेत सहाय्यक लोको पायलट म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या आणि सात वर्षानंतर त्या मुख्य लोको पायलट होवून त्यांनी ५ जानेवारीला पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकातून मालवाहतून गाडी चालवली. ही गाडी त्यांनी ६ जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचवली.
कुमकुम यांच्यासोबत या प्रवासात सहाय्यक लोको पायलट उदिता वर्मा आणि गार्ड आकांक्षा राय यांची साथ होती. अशा प्रकारे पूर्णपणे महिलांच्या बळावर ही मालवाहतून गाडी चालवली गेल्याच्या घटनेची नोंद पश्चिम रेल्वेच्या इतिहासात केली आहे. आपल्या कामगिरीबद्दल या तिघींनाही कमालीचा अभिमान वाटत आहे. माञ त्यांना आता राजधानी, बुलेट ट्रेन चालवण्याचाही मानस पुर्णत्वास न्यायचा आहे. त्यामुळं आता त्यांच्या या प्रवासावर साऱ्यांचीच नजर राहणार आहे.
दरम्यान, महिला चालकांकडून संपूर्ण मालवाहू रेल्वे चालवण्याची पश्चिम रेल्वेच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. पहारेकरी आणि लोको पायलट यांच्या कठीण कामामुळे या पदांवर नोकरीसाठी फारच कमी महिला पुढे येतात. भारतीय रेल्वेमध्ये आव्हानात्मक नोकरीसाठी, इतर महिलांना प्रेरित करण्यासाठी ही कामगिरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल हे नक्की.