अमेरिकेने भारताला 40 लाख डॉलर्सच्या 307 पुरातन वस्तू केल्या परत, 11व्या शतकातील विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीचाही समावेश
US Returns 307 Antiquities to India: अमेरिकेने भारताला 307 पुरातन वास्तू परत केल्या आहेत. ज्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.
US Returns 307 Antiquities to India: अमेरिकेने भारताला 307 पुरातन वस्तू परत केल्या आहेत. ज्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. ज्या सुमारे 15 वर्षांच्या तपासानंतर चोरी किंवा तस्करीनंतर देशाबाहेर नेण्यात आल्या होत्या. या वस्तूंची किंमत सुमारे 32.93 कोटी म्हणजे 40 लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे. अमेरिकेने परत केलेल्या वस्तूंमध्ये 11व्या शतकातील विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीचाही समावेश आहे. यातील बहुतांश वस्तू तस्कर सुभाष कपूर यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. सुभाष कपूर सध्या तुरुंगात आहेत.
मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अल्विन ब्रॅग यांनी सोमवारी सुमारे 40 लाख डॉलर्स किमतीच्या 307 पुरातन वस्तू भारतात परत करण्याची घोषणा केली. ब्रॅग म्हणाले की, मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयाने कपूर याच्या ठिकाणांवर छापे टाकून यापैकी 235 वस्तू जप्त केल्या. सुभाष कपूर अफगाणिस्तान, कंबोडिया, भारत, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड आणि इतर देशांमधून मालाची तस्करी करण्यास मदत करत होता, असेही ब्रॅग यांनी म्हटले आहे.
मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या समारंभात पुरातन वस्तू भारताकडे सुपूर्द करण्यात आल्या. भारताचे कौन्सुल जनरल रणधीर जैस्वाल आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीचे कार्यवाहक डेप्युटी स्पेशल एजंट क्रिस्टोफर लाऊ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अमेरिकेने गेल्या वर्षी देखील 157 पुरातन वस्तू केल्या होत्या परत
गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेने 157 पुरातन वस्तू परत केल्या होत्या. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन या दोघांनीही सांस्कृतिक वस्तूंची चोरी आणि तस्करी रोखण्यासाठी आपले प्रयत्न मजबूत करण्याचे स्वीकार केले होते. गेल्या वर्षी अमेरिकेने अंदाजे 1.23 अब्ज रुपये किंवा 15 मिलियन डॉलर्स किमतीच्या 248 प्राचीन वस्तू भारताला परत केल्या.
डिस्ट्रिक्ट अॅटर्नी (DA) कार्यालयाने 2012 मध्ये सुभाष कपूरला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये कपूर आणि त्यांच्या सात सहकारींवर चोरीच्या पुरातन वास्तूंची तस्करी करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. जुलै 2020 मध्ये, DA च्या कार्यालयाने 2012 पासून भारतात तुरुंगात असलेल्या कपूरच्या प्रत्यार्पणाबाबत कागदपत्रे दाखल केली. दरम्यान, अमेरिकेने भारताला 682 पुरातन वास्तू परत केल्या आहेत. ज्याची किंमत सुमारे 84 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.