UPSC : बनवाबनवीचा कळस! पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी
बनावट कागदपत्रे सादर करुन सनदी अधिकारी झालेल्या पूजा खेडकर यांच्याप्रमाणेच आणखी काही प्रकरणे समोर येत आहेत.
UPSC and Pooja Khedkar, दिल्ली : यूपीएससीला खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या पूजा खेडकर यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आले. मात्र, त्यानंतरही यूपीएससीला खोटे कागदपत्र सादर करुन फसवाफसवीचा प्रकार सुरुच आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी आल्या आहेत. यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. यूपीएससीकडे देशभरातून विविध ठिकाणांहून 30 तक्रारी आल्याचे समजते. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीने पाठवल्या आहेत.
पूजा खेडकर यांची सनदी सेवेतून बडतर्फ
खोटी कागदपत्र देत युपीएससीची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकरवर आज (दि. 7) कारवाई करण्यात आली आहे. तिला सनदी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात खटलाही सुरु करण्यात आलाय. दरम्यान युपीएससीने कारवाईचा बडगा उगारत तिच्यावर कारवाई केली आहे. मागील आठवड्यात लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी टेक्निकल अडचणी आल्या होत्या. आता मात्र तिला सेवेतून पडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या