Mathura Train Accident: ट्रेन आली, प्लॅटफॉर्मवर थांबली अन् निघताना रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली; मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात
UP Mathura Train Accident: मथुरातील रेल्वे स्टेशनवर भीषण रेल्वे अपघात झाला आहे. मात्र, या ट्रेनमधील प्रवासी आधीच उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
Mathura Train Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) एक दुर्घटना घडलीये. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवाची बाब म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला, लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. काही काळासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भितीचं वारावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी एक ईएमयू (EMU) गाडी थेट मथुरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चढली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे. मथुरा स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ही गाडी शकूर बस्ती येथून आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 10:49 ला ट्रेन आली. त्यावेळी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन हटवल्यानंतर अप मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: शकूरबस्ती से आ रही EMU ट्रेन मथुरा जंक्शन पर ट्रैक छोड़कर प्लेटफॉर्म पर चढ़ गई। (26.09) pic.twitter.com/TmbQCJPUiM
— ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2023
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ईएमयू ट्रेन शकूर बस्ती येथून येत होती. रात्री जवळपास 10.49 वाजता ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचली, ज्यानंतर ट्रेनमधील सर्वच्या सर्व प्रवासी उतरले. ट्रेन सुरू झाली आणि थेट ट्रॅकवरुन खाली उतरुन प्लॅटफॉर्मवर चढली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये पाहायला मिळतंय की, ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढलेलं आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्म तुटला असून ट्रेनचा पुढचा भागही काही प्रमाणात प्रभावित झाल्याचं दिसून आलं आहे.
अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
याबाबत माहिती देताना मथुरा रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर एसके श्रीवास्तव यांनी सांगितलं की, गाडी शकूरबस्ती येथून आली होती. जंक्शनवर ट्रेन थांबली, त्यानंतर सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले, मात्र त्यानंतर ट्रेन अचानक रुळ सोडून प्लॅटफॉर्मवर कशी चढली याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि वरील शेडचं नुकसान झालं आहे. काही वाहनांनाही याचा फटका बसला आहे. या अपघातावेळी ट्रेनमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा हा मोठा अपघात होऊ शकला असता. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. अपघातामुळे सध्या अप मार्गावरील काही गाड्यांवर परिणाम झाला आहे.