भाजपच्या सहयोगी पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?
दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये भाजपने सावध पवित्रा घेतलाय. भाजपने आपले सहयोगी पक्ष असणाऱ्या अपना दल आणि निषाद पार्टीला देण्यात येणाऱ्या जागांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.
UP Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने 5 राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण सध्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील 2 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे. भाजपने आपल्या सहकारी पक्षांना जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपचा सहयोगी पक्ष असणाऱ्या अपना दल या पक्षाला 14 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर निषाद पार्टीला 17 जागा देण्यात आल्या आहेत.
काल रात्री उशीरापर्यंत भाजपची बैठक झाली होती. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. या बैठकीतच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत अपना दल या पक्षाने 25 जागांची मागणी केली होती. तर निषाद पार्टीने 30 जागांची मागणी केली होती. मात्र, शेवटी अपना दल पक्षाला 14 तर निषाद पक्षाला 17 जागा देण्यात आल्या आहेत. मागच्या निवडणुकीत अपना दल या पक्षाला 11 जागा देण्यात आल्या होत्या, तर यावेळी 14 जागा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा बैठक सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसंदर्भातच ही बैठक सुरू आहे. या बैठकीत निवडणुकीसाठी उमेदावारांची यादी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जातेय. निवडणुका होणाऱ्या ५ राज्यांच्या संदर्भात योग्य ती व्युहरचना आखण्यासाठी मागच्या दोन दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरू आहेत. या बैठकांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुक्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह अन्य नेते उपस्थिती दर्शवत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 403 विधानसभेच्या जागा आहेत. या जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 7 मार्चला शेवटच्या म्हणजे 7 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडमार आहे. तर 10 मार्चला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारच्या रॅली किंवा रोड शो काढण्यास परवानगी दिलेली नाही.