Up Election Result 2022 : लखीमपूर खेरी घटनेचा कोणताही परिणाम नाही, भाजपने आठही जागा जिंकल्या
Up Election Result 2022 : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत.
Up Election Result 2022 : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. गुरुवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालात भाजपला हिंसाचाराची घटना घडलेल्या निघासन जागेवर सर्वात मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या गाडीने या आंदोलकांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला होता.
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन येथून भाजपचे उमेदवार शशांक वर्मा यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे आर. एस. कुशवाह यांचा 41, 009 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
लखीमपूर खेरी येथील तिकोनिया गावात 3 ऑक्टोबर रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि लखीमपूरचे खासदार अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तिकोनिया प्रकरणाबाबत विरोधी पक्षांनी सरकारला घेरले होते. यासोबतच अजय मिश्रा यांना निलंबीत करण्याची मागणी केली होती.
लखीमपूर खेरी येथील घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असे मानले जात होते. परंतु, निघासन जागेवरून भाजपच्या उमेदवाराला 1,26,488 मते मिळाली आहेत.
पालिया जागेचे विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार हरविंदर कुमार उर्फ रोमी साहनी यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे प्रीतींदर सिंग यांचा 38,129 मतांच्या फरकाने पराभव केला. तर गोला मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अरविंद गिरी यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे विनय तिवारी यांचा 29 हजार 294 मतांनी पराभव केला. याशिवाय श्रीनगर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंजू त्यागी यांनी सपाचे निकटचे प्रतिस्पर्धी रामशरण यांचा 17,608 मतांनी पराभव केला.
धौरहरा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद शंकर अवस्थी यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे वरुण सिंह यांचा 24,610 मतांनी पराभव केला. लखीमपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार योगेश वर्मा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सपाचे उत्कर्ष वर्मा यांचा 20,578 मतांनी पराभव केला. याबरोबरच कास्ता मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सौरभ सिंह यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे सुनील लाला यांचा 13,817 मतांनी पराभव केला. याशिवाय मोहम्मदी जागेवरून भाजपचे उमेदवार लोकेंद्र प्रताप सिंग यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे दाऊद अहमद यांचा 4,871मतांनी पराभव केला आहे.