'आधार' हॅक करण्याचा दावा खोटा- UIDAI
बायोमॅट्रिक नोंदणीशिवाय कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड दिलं जात नाही किंवा आधारकार्ड अपडेट केलं जात नाही, असं 'यूआयडीएआय'नं स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : आधार नोंदणी सॉफ्टवेअर हॅक करण्याच्या वृत्तानंतर 'यूआयडीएआय'नं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'यूआयडीएआय'नं म्हटलं की, बायोमॅट्रिक नोंदणीशिवाय कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड दिलं जात नाही किंवा आधारकार्ड अपडेट केलं जात नाही.
याशिवाय आधारची यंत्रणा कोणीही हॅक करु शकत नाही. आधारचं सॉफ्टवेअर आणि आयडी डेटासोबत कुठल्याही प्रकारे तडजोड करता येत नाही. त्यामुळे आधार यंत्रणा हॅक करण्याचे दावे निरर्थक असल्याचं 'यूआयडीएआय'नं म्हटलं आहे.
आधारचं सॉफ्टवेअर हॅक झाल्याचे आरोप 'यूआयडीएआय'नं नाकारले आहेत. तसेच काही लोक जाणूनबुजून नागरिकांमध्ये 'आधार'बाबत संशय निर्माण करत असल्याचा दावा 'यूआयडीएआय'नं केला आहे. आधारकार्डच्या सुरक्षेसंदर्भात सर्व काळजी घेण्यात येत असल्याचं 'यूआयडीएआय'नं स्पष्ट केलं आहे.
बायोमेट्रिक माहिती मिळाल्याशिवाय आधार कार्ड दिलं जात नाही. तसेच आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट करण्यासाठी नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे आधारकार्डाच्या सॉफ्टवेअरमध्ये व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणतीही नोंदणी केली जाऊ शकत नसल्याची माहिती 'यूआयडीएआय'नं दिली.