Saket Gokhale Arrested: तृणमूल काँग्रेस प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांकडून अटक, मोरबी घटनेवरील ट्वीट भोवले?
Saket Gokhale Arrested: तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. मोरबी दुर्घटनेबद्दल केलेल्या एका ट्वीटबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.
Saket Gokhale Arrested: तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे साकेत गोखले (Saket Gokhale Arrested) यांना गुजरात पोलिसांनी जयपूरमधून ताब्यात घेत अटक केली. गोखले यांच्या अटकेचा तृणमूल काँग्रेसने (Trunmul Congress) निषेध केला आहे. गुजरातमधील मोरबी पूलाच्या दुर्घटनेनंतर (Morbi Bridge Collapse) पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी दौरा केला होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने आरटीआयच्या दाव्याने ट्वीट केले होते.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले की, साकेत गोखले यांनी नवी दिल्लीहून जयपूरसाठी रात्री 9 वाजताची फ्लाइट पकडरली होती. जयपूर विमानतळावर गुजरात पोलीस त्याठिकाणी आधीच उपस्थित होते. जयपूरमध्ये उतरल्यानंतर त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. साकेत गोखले यांनी सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास आपल्या आईला फोन करून पोलीस आपल्याला अहमदाबाद येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. दुपारपर्यंत अहमदाबाद येथे पोहचू असेही त्यांनी घरी सांगितले असल्याची माहिती खासदार ब्रायन यांनी दिली. गुजरात पोलिसांनी त्यांना दोन मिनिटे फोन कॉल करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर त्यांचा फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आले असल्याचे ब्रायन यांनी सांगितले.
अहमदाबाद सायबर सेलने साकेत गोखले यांनी मोरबी पूल कोसळल्याबद्दल केलेल्या ट्विटबद्दल गुन्हा दाखल केला असल्याचे ब्रायन यांनी केले. हा प्रकार तृणमूल काँग्रेस आणि विरोधकांना गप्प करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्ष राजकीय वैर आणखी एका पातळीवर नेत असल्याचा आरोप ब्रायन यांनी केला.
साकेत गोखले यांनी केला होता आरोप
साकेत गोखले यांनी माहिती अधिकारातंर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्वीट करत दावा केला होता. या दाव्यानुसार, मोरबी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत, कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण यासाठी 5.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. तर, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 135 जणांच्या कुटुंबीयांना सरकारने केवळ प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई दिली. त्यासाठी एकूण पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा खर्च १३५ लोकांच्या कुटुंबीयांना दिलेल्या नुकसानभरपाईपेक्षा जास्त असल्याची टीका साकेत गोखले यांनी केली होती.
पीआयबीने दावा फेटाळला
पीआयबी फॅक्ट चेक टीमने एका फॅक्ट चेकद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्यासाठी 30 कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. या दौऱ्याच्या खर्चाबाबतच्या आरटीआयला पीआयबीकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते.