BJP President J.P. Nadda : देशातून घराणेशाही आधारीत पक्ष संपतील, केवळ भाजप राहणार; भाजप अध्यक्षांचे वक्तव्य
BJP President J.P. Nadda : देशातून घराणेशाही आधारीत पक्ष संपणार असून महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले आहे.
BJP President J.P. Nadda : महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातून घराणेशाही आधारीत शिवसेनाही (Shivsena) संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी भाजपची ताकद वाढत असून देशात भाजपच राहणार असल्याचे वक्तव्य केले. नड्डा यांनी म्हटले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी आता कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलाच नाही. काँग्रेस 40 वर्षानंतरही भाजपला आव्हान देऊ शकत नाही असेही नड्डा यांनी म्हटले. पक्षाची विचारधारा मजबूत असून लोक ज्या पक्षात 20 वर्ष राहिलीत, तो पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले.
शिवसेना संपतेय, घराणेशाही आधारीत पक्ष संपणार
काँग्रेस आता देशातून संपत असल्याचे सांगत नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला. भाजपची लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली.
भाजपला लोकांनी स्वीकारले
देशात भाजपला लोक स्वीकारत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. आता देशातील 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. ईशान्य भारतात भाजपचे कार्यकर्ते होते. मात्र, आता तिथेही भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत तेलंगणात भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वासही नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपकडे एक विचारसरणी आहे. त्याआधारे कार्यकर्ते जोडले जात आहेत. विचारसरणी नसलेले पक्ष संपले आहेत अथवा संपत आहेत असेही त्यांनी म्हटले.