दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार
अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सोपवले जात होते. मात्र, आता अतिरेक्यांचे मृतदेह कुटुंबीयांना न सोपवण्याचा मोठा निर्णय भारतीय सैन्यानं घेतला आहे.

श्रीनगर : अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सोपवले जात होते. मात्र, आता अतिरेक्यांचे मृतदेह कुटुंबीयांना न सोपवण्याचा मोठा निर्णय भारतीय सैन्यानं घेतला आहे. अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला ज्या पद्धतीनं गर्दी होते, भडकाऊ भाषणं होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता काश्मीरमधील अतिरेक्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरण्यात येणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. युवकांना अशा अंत्ययात्रेत जाण्यापासून रोखणे शक्य नसल्याने गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर लष्कराने असा निर्णय घेतला आहे. याशिवाय अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर दहशतवादी या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात.
सोशल मीडियावर अशा व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आकर्षित केलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र यासारख्या दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या अत्ययांत्रेचा फायदा तरुणांना आकर्षित करण्यासाठी करतात. सोशल मीडियावर अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज व्हायरल केले जातात आणि यातून नवीन दहशतवादी तयार होतात.
दहशतवाद्यांच्या या भरती मोहिमेला आळा घालण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांना ने सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.























