परदेशात जाण्याचा निर्णय बदलला, घरच्या शेतीतच यशाचा मार्ग गवसला, गुळ उद्योगातून दररोज मिळतोय 2 लाखांचा नफा
Success story : आज आपण एका युवा शेतकऱ्याची यशोगाथा (Success story) पाहणार आहोत. या शेतकऱ्याने गुळ उद्योगातून मोटा नफा कमावला आहे.

Success story : अलिकडच्या काळात युवा शेतकरी (Young farmer) आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. शेतीला जोडव्यवसाय करत मोठा नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका युवा शेतकऱ्याची यशोगाथा (Success story) पाहणार आहोत. पंजाबमधील गुरुदासपूरमधील (gurdaspur) युवा शेतकऱ्यानं ऊसापासून गुळ तयार करण्याचा व्यवसाय (Jaggery making business) सुरु केला. कौशल सिंग असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. जाणून घेऊयात त्याची यशोगाथा.
आईला कॅन्सर झाल्यानंतर परदेशात जाण्याचा निर्णय बदलला
आईला कॅन्सर झाल्यानंतर कौशल सिंगने परदेशात जाण्याचा निर्णय बदलला. त्याने आपल्या गावातच ऊसापासून गुळ तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. आता या व्यवसायातून तो कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. कौशलने 22 व्या वर्षी स्वतःचा कृषी व्यवसाय सुरू केला आहे. ज्या वयात तरुण अनेक संभ्रमात असतात, त्या वयात कौशल कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे.
कौशल सिंगला वडिलोपार्जित जमिन होती. त्याची जमीन इतर शेतकऱ्यांना भाड्याने दिली होती. सध्याची पिढी शेतीपासून दूर जात असताना कौशलने शेती क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील इतर तरुणांप्रमाणेच कौशल सिंगही 12वी पूर्ण केल्यानंतर मोठ्या भावाकडे जाण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार करत होता. त्याचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसाही तयार होता. पण शेवटी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एका अत्यंत दु:खद बातमीने धक्का बसला. कौशल सिंहच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यामुळे कौशल सिंगने परदेशात जाण्याचा निर्णय बदलला. कॅन्सरच्या आजारामुळं कौशलच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर कौशलने भारतात राहून आपल्या गावातच काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. त्याने बी.एस्सी. कृषीपर्यंतचे शि७ण पूर्ण केले.
सेंद्रीय पद्धतीनं ऊसाची लागवड
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौशलने दुसऱ्या शेतकऱ्याला भाड्याने दिलेली जमिन परत घेतली. त्याने या 12 एकर जमीनीचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला. कौशलने त्याचा मित्र हरिंदर सिंगसोबत सेंद्रिय पद्धतीने ऊसाची लागवड सुरु केली. कौशलने 10 एकर आणि हरिंदरने 20 एकर जमिनीवर उसाची लागवड केली. 2015 मध्ये त्यांनी उसापासून गूळ आणि साखरेचे उत्पादन घेण्यात सुरुवात केली. जरी सुरुवातीला त्याला मार्केटिंगचे ज्ञान नव्हते, म्हणून त्याने पॅकिंग आणि ब्रँडिंग न करता मालाची थेट विक्री केली. यामध्ये कौशलचे मोठे नुकसान झाले.
पंजाब कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले
दरम्यान, कौशल आणि हरिंदरने पंजाब कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. उत्पादने पॅक करण्यास आणि बाजारात विकण्यापूर्वी त्यांना ब्रँड नाव देण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सुरुवातील त्यांनी गावाजवळच्या बाजारात उत्पादने विकण्यास सुरुवात केली. यश आणि अपयश या दोन्हींचा सामना त्यांनी केला. काही दुकानदारांनी त्याची उत्पादने आनंदाने स्वीकारली पण काहींनी स्वीकारली नाही. पण हळुहळू कौशलने मार्केटमध्ये आपले पाय रोवले आणि त्याचे चांगले परिणाम मिळू लागले. कौशलने नोंदणी करण्यापूर्वी SWEET GOLD हे ब्रँड नाव दिले परंतु हे नाव उपलब्ध नसल्याने नंतर त्यांनी ते CANE FARMS असे केले.
शेतीपासून मार्केटिंगपर्यंत सर्व गोष्टींची काळजी
आज कौशल आणि त्याच्या मित्राने शेतीपासून मार्केटिंगपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. संपूर्ण पंजाबमध्ये त्यांची उत्पादने विकत आहेत. त्याने आपल्या ब्रँडचा लोगोही डिझाइन केला आहे. पूर्वी तो बाजारातून बॉक्स आणि स्टिकर्स विकत घेत असे, पण आता कौशलने सर्व काही आपल्या स्तरावर तयार करण्यास सुरुवात केली आहे.
गुळ विक्रीतून 8 कोटी रुपयांचा नफा
एका हंगामात कौशलला गुळ विक्रीतून 8 कोटी रुपयांचा नफा मिळत आहे. महिन्याला रोज दीड ते दोन लाख रुपयांच्या गुळाची विक्री होत आहे. या व्यवसायाकून कौशलची मोठी आर्थिक प्रगती झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:























