अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेतील कॅनसस सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शरत कोप्पू असं 26 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. अज्ञात व्यक्तींनी शरतची हत्या केली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅनसस सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शरत कोप्पू असं 26 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. शरत मुळचा तेलंगणामधील वारंगलचा रहिवासी आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात शरतचा मृत्यू झाला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
शरतच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ संदीप वेमुलाकोंडाने आपलं दु:ख व्यक्त केलं. संदीपने सांगितलं की, 'शरत अमेरिकेत अनेक अपेक्षा आणि मोठी स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत होता. जानेवरी 2018ला शरत अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. काल रात्री अचानक काही अज्ञात व्यक्तींनी शरतची गोळ्या झाडून हत्या केली.'
शनिवारी रात्री कॅनसस सिटीमधील एका रेस्टॉरंटमध्ये शरत गेला होता. त्याचवेळी रेस्टॉरंटमध्ये काही अज्ञात लोक घुसले आणि गोळीबार करु लागले. या गोळीबारात शरतला गोळी लागली आणि तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत शरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याप्रकरणात लक्ष घालून दोषींना अटक करण्याची आवाज उठवावा, अशी मागणी शरतच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच शरतचा मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी मदत करावी अशी विनंतीही शरतच्या कुटुंबीयांनी अमेरिकेच्या दुतावासाला केली आहे.
















