एक्स्प्लोर
राष्ट्रपती निवडणूक: पहिली चाल कोण खेळणार?
नवी दिल्ली: देशातल्या सर्वोच्च पदावर कोण विराजमान होणार हे ठरवणाऱ्या निवडणुकीला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठीची अधिसूचना आज निवडणूक आयोगाने जारी केली. 28 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. अवघे काही दिवस उरल्यानं एनडीए, यूपीए अशा दोन्ही गटात राजकीय डावपेचांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजधानीतला राजकीय पारा चांगलाच वाढला आहे. दोन्ही बाजूंनी खलबतं सुरु झाली आहेत, पण पहिली चाल कुणी खेळायची यावरुन साशंकता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या उपस्थितीत आज यूपीएच्या प्रमुख पक्षांची बैठक पार पडली. गेल्या महिनाभरातली यूपीएची ही दुसरी बैठक.
उमेदवार सर्वसहमतीचा असावा अशी भूमिका दोन्ही बाजू व्यक्त करत आहेत. भाजपनं आपणही तसे प्रयत्न करतोय हे दाखवण्यासाठी तीन मंत्र्यांची एक समितीही नेमली आहे. अरुण जेटली, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू यांची ही समिती केवळ एनडीएच नव्हे, तर इतरही विरोधी पक्षांशी चर्चा करुन सहमतीचा उमेदवार देता येईल का याची चाचपणी करणार आहे.
पण दुसरीकडे हेही लक्षात घ्यायला हवं की इतिहासात पहिल्यांदाच भाजपला आपल्या पसंतीचा राष्ट्रपती नेमता येईल एवढं बहुमत हाताशी आहे. त्यामुळे संघातल्या एका गटाला हिंदुत्ववादी चेहरा देण्याची हीच योग्य वेळ आहे असं वाटतंय. शिवाय राष्ट्रपतीची निवडणूक आजवर एकदाच बिनविरोध झाली आहे. त्यामुळे याहीवेळी लढाई होणारच अशी शक्यता आहे.
समोरचा उमेदवार कोण यावरुन आपण पुढची चाल खेळायची अशी विरोधकांची रणनीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 तारखेला अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यामुळे 22 किंवा 23 जूनला एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होईल अशी चर्चा आहे.
जर एनडीएनं पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढे केलं तर यूपीएकडून लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांचं नाव पुढे होण्याची शक्यता आहे. ज्या दलित नेत्या आहेत.
जर एनडीएकडून संघाची छाप असलेला चेहरा पुढे केला गेला, तर यूपीएकडून महात्मा गांधींचे नातू आणि माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
अडवाणींचं नाव खरंतर बाबरी मशीद प्रकरणामुळे मागे पडलं आहे. पण नुकतंच भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अडवाणी हेच सर्वात उत्तम पर्याय असल्याचं सांगत त्यांच्यासाठी लॉबिंग सुरु केलंय.
शिवसेना सतत मोहन भागवतांच्या नावाचा राग आळवतेय, पण स्वत: भागवतांनी आपल्याला या पदात रस नसल्याचं म्हटलंय. शरद पवारांना सगळे विरोधी पक्ष उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. पण जिंकण्याची खात्री असल्याशिवाय ते फंदात पडत नाहीत. ते कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नसतील असं प्रफुल्ल पटेलांनीही म्हटलंय.
अब्दुल कलामांसारखा बिगरराजकीय चेहरा वाजपेयींप्रमाणे मोदीही विरोधकांना निरुत्तर करणार की इतिहासानं पहिल्यांदाच दिलेली संधी साधत हिंदुत्ववादी चेहरा सर्वोच्च पदावर बसवणार याचं उत्तर लवकरच कळेल.
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement