Weather Update : मुंबई, पुण्यात तापमान वाढलं, सिक्कीमसह पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी; येत्या काही तासांत मान्सून पूर्णपणे माघारी परतणार
IMD Weather Update : भारतीय हवामान विभागानुसार, उत्तर पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातूनही परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
Weather Update Today : देशातील बहुतेक भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला आहे. राज्यासह देशात काही भागांत तापमान (Temperature Rises) वाढलं आहे. महाराष्ट्रात पुणे (Pune), मुंबई (Mumbai) त उन्हाच्या झळा बसत आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून पूर्णपणे माघारी परतेल. भारतीय हवामान विभागानुसार, उत्तर पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातूनही परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं दिसून येत आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
मान्सून पूर्णपणे माघारी परतणार
पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशातील उर्वरित भागांमधून नैऋत्य मान्सूनच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भागातही मान्सून परतणार आहे. पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राच्या भागातून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरतील. देशात गेल्या 24 तासांत मेघालयमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मेघालयमधील सोहरा येथे 28 सेमी, शेला येथे 27 सेमी, पिनूरस्ला येथे 15 सेमी, अरुणाचल प्रदेशातील पक्के येथे 8 सेमी आणि ओडिशातील तिहिडी 8 सेमी पाऊस झाला आहे.
सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. येत्या 24 तासांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरबाधित लोकांसाठी मदत कार्य सुरु आहे. सिक्कीममधील खराब हवामानामुळे सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिक्कीमध्ये पुरामुळे सुमारे 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत.
ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांमधून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेत आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेऊ शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.