Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवाला यांना सर्वात जवळून गोळी घालणारा शूटर अंकित सिरसाला अटक
Sidhu Moose Wala Murder Case : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळी झाडणारा शूटर अंकित सिरसाला अटक केली आहे.
Sidhu Moose Wala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) मर्डर मिस्ट्रीमध्ये मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलनं सिद्धू यांना गोळी मारणारा शूटर अंकित सिरसाला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडणारा शूटर म्हणजे, अंकित सिरसा. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर फौजी आणि अंकित एकत्र पळून गेले होते. सिद्धू मूसवाला हत्येच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये 6 शूटर्स समोर आल्यानं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला मोठं यश मिळालं आहे.
पोलिसांनी या मर्डर केसमधील संशयित असणाऱ्या अनेक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच, सिद्धू यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सची धरपकडही सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शूटर्स लॉरेंस बिश्नोईचे निकटवर्तीय आहेत. या सर्व शूटर्सना अटक करण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पोलिसांकडून सातत्यानं धाडसत्र सुरु आहे.
याच्या काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी मूसवाला हत्या प्रकरणात हरियाणातील फतेहाबाद येथे छापा टाकला होता, जिथे आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं.
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी
मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या
पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.