दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची निर्णायक आघाडी
Dadra & Nagar Haveli Bypoll election शिवसेनेचा पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर खासदार निवडून येणार आहे. दादर नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
सिल्वासा: दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी आघाडी घेतली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून कलाबेन डेलकर यांनी एकतर्फी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 1 लाख दोन हजार मते मिळाली असून भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 56 हजार 636 मते मिळाली आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे.
कलाबेन डेलकर यांचा विजय झाल्यास त्या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार असणार आहेत. या निवडणुकीच्या काही दिवस आधीच कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीसाठी शिवसेने जोर लावला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.
First step outside Maharashtra, giant leap towards Delhi via Dadra Nagar Haveli ! #ChaloDelhi pic.twitter.com/8sbqBgSbna
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 2, 2021
दिवंगत खासदार मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत सात वेळेस निवडून आले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजप खासदार नथुभाई पटेल यांचा 9000 मतांनी पराभव केला होता. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.
1990 मध्ये उत्तर प्रदेशात पवन पांडे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचं पहिलं सीमोल्लंघन आहे. कलाबेन डेलकर यांनी बॅट या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर ७२ तासांमध्ये शिवसेनेकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांचेही बॅट हे निवडणूक चिन्ह होते.